Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 7 जून 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
LIVE NEWS & UPDATES
-
पाईपलाइन फुटल्यामुळे धुळ्यातील काही भागात पाणीटंचाई
धुळ्यातील प्रभाग क्रमांक दोनमधील देवपूर भागात पाणीटंचाई सुरु झाली आहे. पोतदार शाळेजवळ मुख्य पाईपलाईन फुटल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. शाळेच्या कामासाठी सुरू असलेल्या खोदकामादरम्यान ही पाईपलाईन फुटली आहे. पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे.
-
ठाणे पोलीस ठाण्यात लक्ष्मण हाके यांच्याविरोधात तक्रार
उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी ठाणे पोलिस ठाण्यात लक्ष्ण हाके यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये त्यांनी अजित पवार यांच्यावर सातत्याने खालच्या पातळीला जाऊन लक्ष्मण हाके टीका करत असल्यामुळे लोकांच्या भावना दुखावणे, दोन समाजात तेढ निर्माण होत आहे असे म्हटले आहे.
-
चिपळूण कराड मार्गावर कुंभार्ली घाटात संरक्षक कोसळल्याने रस्ता खचण्याचा धोका
चिपळूण कराड मार्गावर कुंभार्ली घाटात संरक्षक कोसळल्याने रस्ता खचण्याचा धोका वाढला आहे. रस्ता खचल्यास घाटातील वाहतूक बंद होण्याची भीती आहे. खोल दरी असलेल्या ठिकाणी असलेली संरक्षक भीत कोसळून रेलिंग देखील निखळले आहे.

-
शिवसेना-मनसे युतीविषयी घोषणाबाजी
अमरावतीमध्ये उध्दव ठाकरेंच्या आणि राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांच्या शिवसेना-मनसे युतीचा विजय असो अशी घोषणाबाजी करण्यात आली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे अमरावतीमध्ये शिवसैनिक आणि मनसैनिकांनी इच्छा वर्तवली. मुंबईत युती झाल्यास पहिले फटाके अमरावतीमध्ये फुटणार असा निर्धार मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
-
मान्सूनपूर्व पावसाने शेती पिकाचे नुकसान
लासलगावमध्ये गेल्या मे महिन्यात मान्सूनपूर्व पावसाने शेती पिकाचे नुकसान झाले. तर यंदा शेती पीक बियाण्यांच्या दर वाढीचे शेतकर्यांसमोर संकट उभे ठाकले आहे. मका, कांदा बियाण्यांच्या दारात अडीचशे ते साडे तीनशे रूपयांची वाढ झाली आहे. भाजीपाल्याच्या बियाण्यांचे दर स्थिर झाले. तर सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षी सोयाबीनला बाजार भाव नसल्याने सोयाबीनच्या बियाणे दारात दोनशे रुपयांची घसरण झाली आहे.
-
जेष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचे वयाच्या ९२ वर्षी निधन
दाजी पणशीकर यांच्या पश्चात पत्नी, दोन कान्या, मुलगा, जावई व सुन असा परिवार..त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि वैचारिक विश्वातील एक उज्वल दीप मालवला असून गेल्या ५० वर्षांचा सांस्कृतिक इतिहास जपणारे एक व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना राज्यभरातून व्यक्त होत आहे. आजोबा वासुदेवशास्त्री पणशीकर यांच्याकडून मिळालेल्या हिंदू धर्मग्रंथ आणि परंपरांचा ठेवा त्यांनी अधिक सखोलतेने पुढे नेला. देश-विदेशात त्यांनी सुमारे २,५०० हून अधिक व्याख्याने दिली.
-
कल्याण-डोंबिवलीत मुसळधार पाऊस
कल्याण डोंबिवलीत गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आज सकाळपासून पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सकाळपासूनच कल्याण डोंबिवली परिसरात ढगाळ वातावरण असून अचानक पावसाचा जोर वाढल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसाचा जोर कायम राहिला तर सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
-
राहुल गांधींचा मोठा आरोप
“महाराष्ट्रनंतर आता बिहारमध्येही मॅच फिक्सिंगची तयारी सुरू आहे.” या त्यांच्या वक्तव्याने सध्या राजकीय धुरळा उडवून दिला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठी गडबड झाल्याचा पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी आरोप केला. संध्याकाळी अचानक ईव्हीएमचे मतदान कसे वाढले असा सवाल यापूर्वी राहुल गांधी यांनी विचारला होता.
-
हगवणे मायलेकाला न्यायालयीन कोठडी
शशांक हगवणे आणि लता हगवणे यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. हगवणे माय लेकासह इतर चार आरोपींना ही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. आता हगवणे माय लेकांची येरवडा कारागृहात रवानगी होणार आहे.
-
सामनात आलेला फोटो मी पाहिलेला नाही – बाळा नांदगावकर
“सामनात आलेला फोटो मी पाहिलेला नाही. पक्षाला काय फायदा होईल, तसा विचार करावा लागतो. युतीचा विषय अद्याप माझ्या हातात नाही. युती संदर्भात काही भाष्य करणार नाही. वरिष्ठ पातळीवरील चर्चेची मला माहिती नाही” असं मनसेचे नेते बाळा नांदगावकर म्हणाले.
-
निलेश चव्हाणला आज न्यायालयासमोर हजर करणार
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात सह आरोपी असलेल्या निलेश चव्हाणला आज बावधन पोलिस न्यायालयासमोर हजर करणार आहेत. निलेश चव्हाणची आज पोलीस कोठडी संपलेली आहे. एक वाजता बावधन पोलीस निलेश चव्हाणला न्यायालयासमोर हजर करतील. निलेश चव्हाणला आज न्यायालयीन कोठडी होण्याची शक्यता.
-
हगवणे माय लेकांची येरवडा कारागृहात रवानगी होणार
शशांक हगवणे आणि लता हगवणे यांना न्यायालयीन कोठडी. हगवणे माय लेकासह इतर चार आरोपींना ही न्यायालयीन कोठडी. आता हगवणे माय लेकांची येरवडा कारागृहात रवानगी होणार.
-
ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्यावर शरद पवार काय म्हणतात?
“स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीमध्ये जागा वाटप व्यवस्थित होईल असं वाटत नाही” असं शरद पवार म्हणाले. राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र आले तर मुंबई महानगरपालिकेत काय परिस्थिती असेल? यावर शरद पवार म्हणाले की, “आतापर्यंतचा अनुभव असा आहे, राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते मात्र मते भेटत नाहीत. उद्धव ठाकरेंना मात्र मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश येते” असं शरद पवार म्हणाले.
-
ठाकरे बंधु एकत्र आलेत, तरी राजकारणात काही होणार नाही – रामदास कदम
“ठाकरे बंधु एकत्र आलेत, तरी राजकारणात काही होणार नाही. उद्धव ठाकरेंकडे बाळासाहेबांचा वैचारिक वारसा नाही. राज ठाकरेंच्या मुलाला उद्धव ठाकरेंनी पाडलं. उद्धव ठाकरेंनी नेत्यांना स्टेजवरुन खाली उतरवलं. उद्धव ठाकरेंचा खरा चेहरा लोकांसमोर आला आहे” अशी टीका शिवसेना नेते रामदास कदम यांनी केली.
-
पुणे शहरात जोरदार पावसाला सुरुवात
पुणे शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. आज दिवसभर शहरात हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरु राहणार आहे. पुणे जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
-
उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर आहेत. माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील गावनिहाय सभासद आणि आजी-माजी पदाधिकारी यांच्यासोबत भेटीगाठी त्यांनी घेतल्या आहे.
-
मेट्रोच्या कामामुळे घोडबंदर मार्गावरील वाहतुकीत आजपासून बदल
ठाण्यातील घोडबंदरपट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात मेट्रो मार्गीकीचं काम सुरू आहे. या मार्गिकेसाठी पिलरवर गर्डर टाकण्याचे काम देखील युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस रात्री 11 ते पहाटे सहा वाजेपर्यंत वाहतूक मध्ये बदल करण्यात आला आहे.
-
मुख्यमंत्री नागपूरकडे जाणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रात्रभर गडचिरोलीत मुक्काम होता. आता पोलीस विश्रामगृहातून थोड्याच वेळात ते नागपूरसाठी रवाना होणार आहे. त्यापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोर असलेल्या शहीद स्मारकावर जाऊन ते आदरांजली वाहणार आहे.
-
प्रेम प्रकरणातुन युवकाची हत्या
प्रेम प्रकरणातुन युवकाची हत्या झाली आहे. ही घटना यवतमाळच्या संकट मोचन रोड येथे घडली आहे. सूरज घटाळे असे मृत तरुणाचे नाव आहे. प्रियसीच्या आधीच्या प्रियकराने मित्रांच्या मदतीने काटा काढला. हत्येच्या घटनेचा थरार cctv कॅमेरात कैद झाला आहे. यवतमाळ शहरात 72 तासात दोन हत्या झाल्या आहेत.
-
शशांक आणि लता हगवने या माय लेकासह तीन जणांना आज न्यायालयात आणण्यात येणार
शशांक आणि लता हगवने या माय लेकासह जेसीबी फसवणूक प्रकरणातील प्रणव साठे आणि तीन एजंट यांची आज खेड न्यायालयात एकत्रित सुनावणी होणार आहे. जेसीबी फसवणूक प्रकारात एकूण सहा आरोपी अटक करण्यात आली आहे. सकाळी 10.30 वाजता या सहा जणांना खेड न्यायालयात आणण्यात येणार आहे.
-
दुर्गाडी किल्ल्यावर बकरी ईद दिवशी शिवसेनेचं ‘घंटा नाद’ आंदोलन
दुर्गाडी किल्ल्यावर बकरी ईद दिवशी शिवसेनेचं ‘घंटा नाद’ आंदोलन – शिंदेच्या शिवसेनेच्या आंदोलनानंतर ठाकरे गट देखील आक्रमक… दुर्गाडी किल्ल्यावर बकरी ईद दिवशी शिवसेनेचं ‘घंटा नाद’ आंदोलन… शिंदे गटाच्या आंदोलनानंतर ठाकरे गटही मैदानात – परिसरात वाढला तणाव… 35 वर्षांपासून मंदिर बंद ठेवण्याच्या निषेधार्थ शिवसेनेचं आंदोलन सुरू… पोलिसांचा मोठा बंदोबस्त, बॅरीगेटिंग ओलांडण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न
-
बकरी ईद निमित्त मुस्लिम धर्मीय बांधवांचे सामूहिक नमाज पठण
धुळे येथे बकरी ईद निमित्त मुस्लिम धर्मीय बांधवांचे सामूहिक नमाज पठण… शहरातील ईदगाह मैदानावर पार पडणार सामूहिक नमाज पठण… सामूहिक नमाज पठणासाठी मुस्लिम धर्मीय बांधवांची गर्दी होण्यास सुरुवात… ईदगाह मैदान परिसरात पोलिसांचा कडे कोट बंदोबस्त … देशाच्या शांतता आणि सुरक्षेसाठी मुस्लिम धर्म बांधवांकडून प्रार्थना….








