टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

वकील मारहाण प्रकरण: पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी वकील संघटनेची मागितली माफी

सांगोला(प्रतिनिधी):-संपूर्ण राज्यभर गाजत असणार्‍या सांगोला येथील वकील मारहाण प्रकरणात अखेर वकिलास मारहाण करणार्‍या पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांना चांगलीच उपरती झाली असून मारहाण केलेल्या वकिलासह सांगोला येथील वकील संघटनेची त्यांनी बिनशर्त माफी मागितली आहे. बुधवार दि 8 एप्रिल रोजी सांगोला येथील न्यायालयातील वकील कक्षात जाऊन संघटनेतील सर्व वकिलांच्या समोर विनोद घुगे यांनी माफी मागितली.

मंगळवार दि 31 मार्च रोजी सांगोला पोलीस स्टेशन परिसरात अ‍ॅड सागर मेटकरी या वकिलास पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी मारहाण करून त्यांना रात्री दीड वाजेपर्यंत बसवून ठेवले होते तसेच त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून कोर्‍या कागदावर सही घेतली होती.एका वकिलास अशा पद्धतीने मारहाण झाल्याने संपूर्ण राज्यातील वकील संघटना आक्रमक झाल्या होत्या. अनेक ठिकाणी वकिलांनी काम बंद ठेवून पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांचा निषेध व्यक्त केला आणि सांगोला येथील वकील संघटनेला आपला पाठिंबा दिला होता.

यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड.विशालदिप बाबर व सर्व वकील बांधवांनी माफीनाम्यानंतर हा विषय येथेच संपला असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे सांगोला पोलीस स्टेशनमध्ये कोणतेही वकील आल्यानंतर त्यांना सन्मानाची वागणूक द्यावी असेही आवाहन अध्यक्ष अ‍ॅड.विशालदिप बाबर यांनी याप्रसंगी करुन या विषयावर पडदा टाकला असल्याचे सांगितले.

याप्रकरणी राज्याचे विशेष सरकारी वकील खासदार अ‍ॅड उज्ज्वल निकम आणि महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष अ‍ॅड मिलिंद थोबडे तसेच अ‍ॅड प्रमोद भोकरे यांच्यासारख्या दिग्गज वकिलांनी लक्ष घातल्याने या प्रकरणाकडे राज्याचे लक्ष लागले होते. सांगोला वकील संघटनेनेने याबाबत ठाम भूमिका घेऊन जिल्हा पोलीस प्रमुख, विशेष पोलीस महासंचालक व उच्च न्यायालय यांच्याकडे तक्रार करण्याची तयारी दर्शविली होती. तसेच अ‍ॅड.सागर मेटकरी यांनी पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्यावर ऑनलाईन तक्रार दाखल केली होती.

मात्र सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी वकील संघटनेशी संपर्क साधून माफी मागण्यासाठी येण्याची परवानगी अध्यक्ष अ‍ॅड.विशालदिप बाबर व त्यांच्या सहकार्‍यांकडे मागितली होती.त्यामुळे मंगळवार दि 7 एप्रिल रोजी याबाबत सांगोला येथील वकील संघटनेची बैठक पार पडली. याबैठकीमध्ये माफी नाम्याबाबत सविस्तर चर्चा करुन एकमताने माफीसाठी परवानगी देण्यात आली. संपूर्ण राज्यभर याप्रकरणात बदनामी झाल्याने विनोद घुगे यांनी बुधवार दि 8 रोजी सांगोला वकील कक्षात समक्ष येवून अ‍ॅड सागर मेटकरी आणि सर्व वकिलांची माफी मागून या विषयावर पडदा टाकला. पो.नि.विनोद घुगे यांनी माफी मागून यापुढे सर्व वकील बांधवांचा योग्य तो सन्मान राखला जाईल, असेही सांगितले असल्याचे सांगोला बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड.विशालदिप बाबर यांनी सांगितले.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now