IPL 2026: राजस्थान रॉयल्सच्या डावातील ११ व्या षटकादरम्यान कॅमेरा डगआऊटकडे वळला असता, टीम मॅनेजर रोमी भिंडर मोबाईल फोन चालवताना दिसले.

गुवाहाटी: आयपीएल २०२६ मध्ये सलग चार विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या राजस्थान रॉयल्ससाठी (RR) एक अडचण निर्माण करणारी बातमी समोर आली आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) विरुद्धच्या सामन्यादरम्यान राजस्थान रॉयल्सचे टीम मॅनेजर डगआऊटमध्ये मोबाईल फोन वापरताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या शेजारी बसलेला युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी हादेखील फोनमध्ये डोकावताना दिसल्याने खळबळ उडाली आहे.(IPL 2026)
IPL 2026: नेमका प्रकार काय?
राजस्थान रॉयल्सच्या डावातील ११ व्या षटकादरम्यान कॅमेरा डगआऊटकडे वळला असता, टीम मॅनेजर रोमी भिंडर मोबाईल फोन चालवताना दिसले. त्यांच्या शेजारी वैभव सूर्यवंशी बसला होता, जो नुकताच २६ चेंडूत ७८ धावांची तुफानी खेळी करून परतला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी आणि तज्ज्ञांनी आयपीएलच्या (Anti-Corruption) नियमांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
IPL 2026: ललित मोदींकडून संताप व्यक्त
आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी हा व्हिडिओ शेअर करत म्हटले की, “हे पूर्णपणे प्रतिबंधित आहे. अँटी-करप्शन युनिट नक्की कुठे होते?” असा सवाल करत त्यांनी कारवाईची मागणी केली आहे.
IPL 2026: नियम काय सांगतो?
आयपीएलच्या आचारसंहितेनुसार, खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला स्टेडियममध्ये पोहोचल्यावर त्यांचे मोबाईल, स्मार्टवॉच आणि इतर गोष्टी ‘सिक्युरिटी लायझन ऑफिसर’कडे (SLO) जमा करावी लागतात.
ड्रेसिंग रूम: मॅनेजरला केवळ ड्रेसिंग रूममध्ये फोन वापरण्याची परवानगी असते.
डगआऊट: डगआऊटमध्ये फोनचा वापर करण्यास सक्त मनाई आहे.
अपवाद: केवळ अधिकृत ‘अॅनालिस्ट’ला डेटा पाहण्यासाठी लॅपटॉप वापरण्याची मुभा असते.










