टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

सांगोला शहर व तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर; गुरूवार दि.12 जून 2025

Sangola Breaking News; महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, सांगोला तालुक्यातील घडामोडी पाहा एका क्लिकवर, ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडे्स, सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

 

 

सांगोला विद्यामंदिरची तनुजा चोपडे राज्यात प्रथम; एस.एस.सी.परीक्षेत समृद्धी भोसले, अपूर्वा पाटील राज्य गुणवत्ता यादीत

सांगोला (वार्ताहर):- महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या एसएससी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये सांगोला विद्यामंदिर प्रशालेच्या विद्यार्थिनींनी राज्य गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवत उत्तुंग यश संपादन केले.
दिनांक 13 मे, 2025 रोजीच्या एसएससी बोर्ड परीक्षेच्या निकालातून आपल्या अपेक्षित गुणांमध्ये वाढ होत आहे हे लक्षात आल्यानंतर या विद्यार्थिनींनी पुनर्मूल्यांकनाचा मार्ग निवडला यातून कुमारी तनुजा बालाजी चोपडे -100% (राज्य – प्रथम), कुमारी समृद्धी संजय भोसले -99.60% (राज्य – तृतीय), कुमारी अपूर्वा अजित पाटील -99.40% (राज्य – चतुर्थ) गुण मिळवत या विद्यार्थिनींनी राज्य गुणवत्ता यादीत आपले स्थान निश्चित करत सांगोला विद्यामंदिर प्रशालेच्या शिरपेचात गुणवत्ता रुपी मानाचा तुरा रोविला.
पुनर्मूल्यांकनामध्ये कुमारी तनुजा चोपडे आणि समृद्धी भोसले या दोघींचे इतिहास-भूगोल या विषयांमध्ये तर कुमारी अपूर्वा पाटील हिची विज्ञान विषयांमध्ये गुणवृद्धी झाली.
शैक्षणिक वर्ष 2024-25 एसएससी बोर्ड फेब्रुवारी-मार्च 2025 परीक्षेमध्ये सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील एकूण 508 प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी 500 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून प्रशालेचा शेकडा निकाल 98.42 टक्के इतका लागला आहे. यामध्ये विशेष श्रेणीत 244, प्रथम श्रेणीत 153, द्वितीय श्रेणीत 82 तर उत्तीर्ण श्रेणीत 21 विद्यार्थी समाविष्ट आहेत.
या निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी राज्यात प्रथम, तृतीय व चतुर्थ या क्रमांकासह 41 विद्यार्थ्यांनी 95 टक्के पेक्षा अधिक गुण तर 92 विद्यार्थ्यांनी 90 टक्के पेक्षा अधिक गुण मिळवले आहेत.
मराठी विषयात 100 पैकी 98 गुण मिळवणारा एक, संस्कृत विषयात 100 पैकी 100 गुण मिळवणारे चार, हिंदी विषयात 100 पैकी 95 गुण मिळवणारे दोन, इंग्रजीत 100 पैकी 99 गुण मिळविणारा एक, गणित विषयात 100 पैकी 100 गुण मिळवणारे अकरा, विज्ञान व तंत्रज्ञान या विषयात 100 गुण मिळवणारा एक, समाजशास्त्रात 100 पैकी 98 गुण मिळवणारे तीन तसेच टेक्निकल मध्ये 100 पैकी 92 गुण मिळवणारा एक विद्यार्थी असे दैदीप्यमान यश मिळवणारी सांगोला विद्यामंदिर प्रशाला ही तालुक्यातील अग्रगण्य शाळा ठरली आहे.
या विद्यार्थ्यांना सुरेश मस्तुद, मकरंद अंकलगी, शुभांगी घोंगडे, बाळराजे सावंत, उन्मेश आटपाडीकर, शैलजा झपके, शिवाजी चौगुले, उज्वला कुंभार, सचिन बनकर, टॉपर्स विभाग प्रमुख यतिराज सुरवसे, नागेश भोसले, नामदेव खंडागळे, सूर्यकांत कांबळे, श्रीकृष्ण वाघमारे, बंडू लेंडवे, उत्तम बेहेरे, अमोल रणदिवे, उमेश नष्टे, प्रशांत रायचुरे, अन्सार इनामदार, मुस्तफा नदाफ, गणेश हुंडेकरी, अनिता घोंगडे, प्रसाद कुलकर्णी, मारुती बोरकर, उत्तम सोनलकर, सिद्धेश्वर नवले, संतोष लवटे, सुभाष निंबाळकर या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
वरील सर्व गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्था अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सर, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे सर, खजिनदार शंकरराव सावंत सर, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके साहेब, कार्यकारणी सदस्य विश्वेशजी झपके यांच्यासह सर्व संस्था सदस्य प्राचार्य अमोल गायकवाड, उपमुख्याध्यापिका सौ.शाहिदा सय्यद, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, पर्यवेक्षक सुरेश मस्तुद, मच्छिंद्र इंगोले, प्रदीप धुकटे यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले.

बलवडी गावची सुकन्या सई अमोल शिंदे हिचा जंगी सत्कार व भव्य मिरवणूक

बलवडी (वार्ताहर):-उत्तराखंड येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत बलवडी गावची सुकन्या हिने रौप्य पदक प्राप्त केल्याबद्दल वेताळदादा शिंदे परिवार व श्री शिवछत्रपती कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, बलवडी यांच्यावतीने गावची सुकन्या सई अमोल शिंदे हिचा भव्य सत्कार त्याचप्रमाणे ऑपरेशन सिंदूर मधील बलवडी गावचे सुपुत्र मेजर गणेश पवार, मेजर दत्ता शिंदे, मेजर प्रदीप शिंदे यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे सर्व पालक वर्गांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. सत्कार सोहळ्यामध्ये डॉ.शिवाजीराव ढोबळे, सरपंच माऊली राऊत, महादेव शिंदे, माजी सरपंच बाळासाहेब शिंदे, माजी सरपंच विजय शिंदे, महादेव शिंदे, उपसरपंच समाधान शिंदे, ग्रा.पं.सदस्य शिवाजी शिंदे, विलास धायगुडे, चंद्रकांत यादव, बलवडी प्राथमिक शाळा व बलवडी प्रशालेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांच्यासह बलवडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी सई शिंदे, मेजर गणेश पवार, मेजर दत्ता शिंदे, मेजर प्रदीप शिंदे यांची उघड्या जीपमधून गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. सर्व उपस्थित मान्यवरांनी सई अमोल शिंदे हिचे यशाबद्दल कौतुक करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सोहळा यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी वेताळदादा शिंदे परिवार व श्री शिवछत्रपती कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, बलवडी च्या सर्व पदाधिकार्‍यांनी अथक परिश्रम घेतले. सूत्रसंचालन एस.डी.शिंदे सर, तात्या शिंदे यांनी तर आभार सयाजीराव मोहिते यांनी मानले.

 

आज सांगोला येथे प्रभाग क्रमांक 8 मधील गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन

सांगोला: सांगोला शहरातील प्रभाग क्रमांक 8 मधील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक 8 मधील दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आज गुरुवार दि.12 जून 2025 रोजी सायंकाळी 6.00 वाजता चौंडेश्वरी मंदिर, कोष्टी गल्ली, सांगोला येथे संपन्न होणार आहे.
त्याचप्रमाणे आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांची पंचायत राज्य समिती आणि महाराष्ट्र राज्याच्या धर्मदाय खाजगी रुग्णालय समितीवर सदस्यपदी निवड झाल्याबद्दल, तसेच शेतकरी कामगार पक्ष, प्रभाग क्रमांक 8 वतीने त्यांचा भव्य नागरी सत्कारही यावेळी आयोजित करण्यात आला आहे.
तरी प्रभाग क्रमांक 8 मधील सर्व कार्यकर्त्यांनी,विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी वेळेवर उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, गुणवंत विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवावे, असे आवाहन प्रभाग क्रमांक 8 मधील कार्यकर्त्यांनी केले आहे.

 

कोळे येथे शेख सर यांचे सक्सेस क्लासेस सुरू

कोळे (वार्ताहर):- सांगोला तालुक्यातील कोळे येथे शेख सर यांचे इंग्रजी विषयाचे सक्सेस क्लासेस नुकतेच मोठ्या उत्साहात दीप प्रज्वलन करुन व सरस्वती मातेच्या फोटो चे पूजन करून शुभारंभ करण्यात आला. यावेळी एल. वाय.देशमुख (सर), बापू आलदर पंच, बीरा आलदर पंच यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाचा शुभारंभ संपन्न झाला. नरळे सर यांचे बहुमोलाचे सहकार्य लाभले.
यावेळी सर्व शिक्षक मित्र, विद्यार्थी-विद्यार्थिनी, विविध पक्षाचे पदाधिकारी नेते मंडळी, कोळे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेख सर यांनी उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले.

 

माजी सैनिक कल्याणकारी संस्थेच्यावतीने आरोग्य मार्गदर्शन शिबिर संपन्न

सांगोला(प्रतिनिधी): माजी सैनिक कल्याणकारी संस्था आणि ए डब्ल्यू पी एल जीकी आर्मी बेस संस्था आहे यांचे संयुक्तपणे माजी सैनिक यांचेसाठी माजी सैनिक वस्तीग्रह सांगोला येथे आरोग्य शिबिर घेण्यात आले. एडब्ल्यूपीएल या संस्थेचे श्री यादव सर, जाधव मॅडम, चौगुले मॅडम यांनी शिबिराचे आयोजन माजी सैनिकासाठी केले होते.
माजी सैनिक निवृत्तीनंतर आपले जीवन कुटुंबाबरोबर जगत असताना आर्मी सारखे पेटी परेड नसले मुळे शरीरात व्याधी निर्माण होतात. बीपी शुगर गुडघेदुखी कंबर दुखी असे आजार उद्भवतात. या आजारावर थोड्या दिवसासाठी औषध घेणे आणि आजार संपवण्यासाठी मुळापासून लागणारी औषध देणे जीवनभर औषधे घ्यावी लागू नये याविषयी आणि आनंदी जीवन जगणे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
माजी सैनिक कल्याणकारी संस्थेचे असे उपक्रम नेहमीच चालू असतात, तालुक्यातील माजी सैनिकांनी प्रत्येक 9 तारखेला होणार्‍या मासिक गेट-टुगेदर साठी मीटिंग साठी आपली उपस्थिती दाखवून सदर शिबिरांचा फायदा मिळवावा आपल्या अडीअडचणी सोडवाव्या यासाठी संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. शिबिरामध्ये ए डब्ल्यू पी एल च्या वतीने उपस्थित माजी सैनिकांचे डोळ्याचे ड्रॉप टाकून प्रॅक्टिकली डोळ्याची पावर वाढू शकते आणि मोतीबिंदू ऑपरेशन टळू शकते याविषयी विशेष मार्गदर्शन करण्यात आले.

 

दीपकआबा साळुंखे-पाटील प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी विलास डोंगरे व्हाईस चेअरमनपदी गोविंद भोसले

सांगोला (प्रतिनिधी):- सांगोला येथील दीपकआबा साळुंखे-पाटील प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी विलास डोंगरे यांची तर व्हाईस चेअरमन पदी गोविंद भोसले यांची निवड करण्यात आली आहे.
प्राथमिक शिक्षकांना अल्प दराने पतपुरवठा करणार्‍या सांगोला येथील दीपकआबा साळुंखे-पाटील प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी विलास डोंगरे यांची तर व्हाईस चेअरमन पदी गोविंद भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी या दोघांचेच अर्ज आल्यामुळे अध्यासी अधिकारी अमर गोसावी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली. निवडीनंतर दोघांचेही सर्व उपस्थितांनी अभिनंदन केले.याप्रसंगी मावळते चेअरमन माणिक मराठे यांचेसह अनेकांनी आपली मनोगते व्यक्त करून नूतन पदाधिकार्‍यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी संचालक तानाजी साळे, वसंत बंडगर, संजय गायकवाड, कमल खबाले, पल्लवी मेणकर, तज्ञ संचालक कैलास मडके, सचिव अमर कुलकर्णी, प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष सुहास कुलकर्णी, तानाजी खबाले, विकास साळुंखे, तालुकाध्यक्ष मोहन अवताडे, संजय काशीद, संतोष निंबाळकर, विश्वंभर लवटे, मनोहर काशीद, उमेश महाजन, नवनाथ साळुंखे, पंकज मसगौडे, संजय सरगर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना नूतन चेअरमन विलास डोंगरे व व्हाईस चेअरमन गोविंद भोसले यांनी संस्थेचा कारभार सर्व सभासदांना विश्वासात घेऊन पारदर्शक केला जाईल असे सांगितले.

 

दिगंबर जगताप हे विद्यामंदिर परिवारातील चालते-बोलते चैतन्य- प्रा.प्रबुध्दचंद्र झपके

सांगोला(प्रतिनिधी):-दिगंबर जगताप सर हे विद्यामंदिर परिवारातील चालते- बोलते चैतन्य असुन ते एक जातिवंत, निष्ठावंत ,हरहुन्नरी व कलंदर कलाध्यापक होते.शिक्षणासाठी जे जे आवश्यक आहे,ते त्यानी केले आहे…सांगोला विद्यामंदिरच्या उभारणीत एक शिक्षक म्हणून, संस्था सदस्य म्हणून व कार्यकारिणी सदस्य म्हणून ते कायम गुरुवर्य बापुसाहेबांच्या समवेत होते,असे गौरवोद्गार सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यानी काढले.
चैतन्य हास्य क्लबचे अध्यक्ष गुरुवर्य जगताप सर यांचा 86 वा वाढदिवस हास्य क्लब तर्फे सांगोला विद्यामंदिर प्रशालेत साजरा करण्यात आला,त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.कृष्णा इंगोले होते.प्रारंभी मान्यवरांचे हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले..चैतन्य हास्य क्लबचे वतीने उत्सवमूर्ती जगताप सर व प्रमुख पाहुणे झपके सर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ सदस्य महादेव झिरपे ,भीमाशंकर पैलवान व जगन्नाथ गोडसे यानी मनोगत व्यक्त केले.गोडसे यांनी सर्व गुरुजनाना धार्मिक पुस्तके भेट म्हणून दिली.सेवानिवृत्त प्राचार्य सुभाष महिमकर, आपुलकी.प्रतिष्ठान अध्यक्ष राजेंद्र यादव, आगतराव नलवडे सर, मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष नारायण विसापुरे यानी जगताप सर यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.कै.गुरुवर्य बापुसाहेब झपके यांचेमुळे जीवन समृद्ध झाल्याची भावना जगताप सर यानी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली.डॉ.कृष्णा इंगोले यानी जगताप सर यांच्या कार्याचा गौरव केला.प्रास्ताविक प्रा.राजेंद्र ठोंबरे यांनी , सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन भागवत पैलवान यानी केले.कार्यक्रमास जगताप सरांचे कुटुंबिय,हास्यक्लब सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

वाकी (शिवणे) सोसायटीच्या चेअरमन पदी श्री.अनिल कापसे यांची बिनविरोध निवड

सांगोला (प्रतिनिधी):- सांगोला तालुक्यातील अतिशय सक्षम व जिल्ह्यामध्ये नावाजल्या जाणार्‍या वाकी(शिवणे) विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी मा.आमदार दिपकआबा साळुंखे पाटील गटाचे युवक नेते श्री. अनिल कापसे यांची नुकतीच सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
गेली सलग 16 वर्षे 100% वसुली असणार्‍या या सोसायटीमध्ये शिवसेना व मा.आमदार दिपकआबा साळुंखे पाटील गटाची सत्ता आहे. युती धर्मामध्ये चेअरमन पदासाठी ठरलेला कालावधी पूर्ण झाल्यानंतर तत्कालीन चेअरमन श्री.संजय जाधव यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर श्री.अनिल कापसे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडणुकीसाठी सांगोला तालुका सहकारी निबंधक कार्यालयाचे श्री.शेख यांनी काम पाहिले.
ही निवड झाल्यानंतर मा. आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या सांगोला येथील संपर्क कार्यालयामध्ये मा. आबांनी त्यांचा सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सत्काराला उत्तर देताना नूतन चेअरमन श्री.अनिल कापसे यांनी आपल्या मनोगतात मा.आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सभासदांच्या व गावाच्या हितासाठी प्रामाणिकपणे कार्य करून संस्थेचे नाव उज्वल करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मधुकर सपाटे, उद्धव पाटील, शिवाजीराव साळुंखे, तुकारामआबा जाधव, श्रीकांत जाधव ,संतोष रोकडे, अनिल जाधव, रघुनाथ पाटील, मच्छिंद्रअण्णा जाधव (गुरुजी) यांचे सह स्थानिक ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे संचालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सत्कार समारंभ प्रसंगी वाकी शिवणे येथील ग्रामस्थांनी मा.आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या सत्कारासाठी हार व मानाचा फेटा आणला असता मा.आबांनी त्यांना नम्रपणे नकार देऊन विकास सेवा सोसायटीची स्वतःच्या मालकीची जागा व इमारत झाल्यानंतर हा सत्कार स्वीकारू असे सांगितले व आपले मनोगत व्यक्त करताना वाकी शिवणे ता.सांगोला येथील अतिशय सक्षम असलेल्या विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन पदाला श्री.अनिल कापसे यांची सर्वांनी निवड करून या पदाला न्याय देणारे योग्य व सक्षम नेतृत्व दिले असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

 

लिटल मिलेनियम प्रिस्कूल सांगोलाचे नवे शैक्षणिक वर्ष उत्साहात सुरू

सांगोला (प्रतिनिधी):- सप्तम सोशल फाउंडेशनच्या लिटल मिलेनियम प्रिस्कूल सांगोला येथे नव्या शैक्षणिक वर्षाचे (2025-26) रंगतदार स्वागत करण्यात आले. प्रशालेच्या पहिल्याच दिवशी चिमुकल्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सुरुवातीला मुलांचे औक्षण करण्यात आले नंतर वेगवेगळ्या गेम्स घेण्यात आल्या. चिमुकल्यांसोबत पालक देखील चिमुकल्यांच्या आनंदात सहभागी झाले. चिमुकल्यांसोबत वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज गेम्स, डान्स व मुलांना गिफ्ट देण्यात आले.लिटल मिलेनियम प्रीस्कूल सांगोला ही सप्तम सोशल फाउंडेशन तर्फे घेण्यात आलेली दिल्ली बेस्ड प्रीस्कूल फ्रेंचाईजी असून या प्रीस्कूलमध्ये सेवन पेटल पॅटर्न राबवला जात असून यामुळे मुलांच्या सात वेगवेगळ्या क्षेत्रात विकासास चालना मिळते. खेळ आणि कृतीच्या माध्यमातून या प्री स्कूलमध्ये चिमुकल्यांचा विकास होतो.
या प्री स्कूलच्या पहिल्या दिवसाची तयारी कॅम्पस इन्चार्ज सौ.पूजा पतंगे, सौ.अनुराधा इंगोले, सौ.स्वाती मस्के, सौ. प्रतिभा पाटील, सौ.प्रणाली देसाई व सौ. अनघा पाटील यांनी केले.

सांगोला शहरातील कापड व्यापारी मोहन भंडारे यांचे निधन

सांगोला (प्रतिनिधी):-सांगोला शहरातील कापड व्यापारी मोहन रामचंद्र भंडारे यांचे मंगळवार दिनांक 10 जून 2025 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.निधनासमयी त्यांचे वय 80 होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा तिसरा दिवस विधी आज गुरुवार दिनांक 12 जून रोजी सकाळी 7.30 वाजता सांगोला येथे होणार असल्याचे त्यांचे नातेवाईकांनी सांगितले.

 

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now