सांगोला शहर व तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर; सोमवार दि.9 जून 2025

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Sangola Breaking News; महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, सांगोला तालुक्यातील घडामोडी पाहा एका क्लिकवर, ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडे्स, सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

 

अन्न सुरक्षा अधिकारी डॉ.मंगेश लवटे यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मान

सांगोला(प्रतिनिधी):-सोलापूर जिल्ह्यातील दूध भेसळखोरीविरुद्ध उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अन्न सुरक्षा अधिकारी डॉ. मंगेश मल्हारी लवटे यांचा अन्न व औषध प्रशासन मंत्री ना.नरहरी झिरवळ, ग्रामविकास व पंचायतराज राज्यमंत्री नाम.श्री. योगेश कदम यांचेहस्ते प्रशस्तीपत्र देवून सन्मानीत करण्यात आले. त्याचप्रमाणे यावेळी अन्न सुरक्षा अधिकारी उमेश भुसे व अन्न सुरक्षा अधिकारी सुनिल जिंतुरकर यांचाही सन्मान करण्यात आला.
जागतिक अन्न सुरक्षा दिन- 2025’ या निमित्ताने यशवंतराव चव्हाण सेंटर येथे अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विशेष राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उत्कृष्ट काम करणार्‍या कर्मचारी व संस्थांचा सत्कार करण्यात आला.
सुगाव भोसे, ता.पंढरपूर, जि. सोलापूर या ठिकाणी दूध भेसळखोरांविरुद्ध धडक कारवाई करुन जनआरोग्याचे दृष्टीने उत्कृष्ट कामकाज केल्यामुळे प्रशासनाची प्रतिमा जनसामान्यांमध्ये उंचावली आहे. आपण केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल प्रशासनामार्फत आपला गौरव करण्यात येत आहे. आपण भविष्यात असेच उत्कृष्ट काम करीत राहाल या अपेक्षेसह आपणास शुभेच्छा ! असे प्रशस्तीपत्रावर नमूद करण्यात आले आहे.
उत्कृष्ठ कार्याबद्दल सन्मानीत करण्यात आले त्याबद्दल अन्न सुरक्षा अधिकारी डॉ. मंगेश लवटे यांचे सांगोला तालुक्यातून सर्वत्र अभिनंदन होत आहे.

बनकरवाडी येथील अभिनेश बनकर याचे अपघातात निधन

सांगोला – सांगोला शहरातील बनकरवाडी येथील अभिनेश अंकुश बनकर याचे शनिवार दि.7 जून रोजी सायंकाळी 8 वा. मोहोळ येथे झालेल्या अपघातामध्ये निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय 22 वर्षे होते.त्याचे पश्चात आई, वडील, बहिण असा परिवार आहे. सांगोला शहरातील बांधकाम व्यावसायिक अंकुश बनकर यांचे ते चिरंजीव आहेत.
अभिनेश अंकुश बनकर हा सिंहगड कॅम्पस कोर्टी येथे इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता.अभिनेश बनकर हा 7 जून रोजी सकाळी मित्रासमवेत अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी गेला होता.देवदर्शन करुन परत येत असताना मोहोळ नजीक अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचा तिसर्‍या दिवसाचा विधी आज सोमवार दि.9 जून 2025 रोजी सकाळी 7.30 वाजता सांगोला शहरातील वाढेगाव नाका येथील स्मशानभूमीत होणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. अभिनेश याचा स्वभाव अत्यंत शांत व मनमिळावू होता. त्यांच्या निधनाने बनकरवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे जयंती महोत्सवानिमित्त जुनोनी येथे आज विविध कार्यक्रमांचे आयोजन

जुनोनी (वार्ताहर):- राजमाता प्रतिष्ठान, जुनोनी यांचेवतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त आज सोमवार दि.9 जुन 2025 रोजी रक्तदान शिबीर, मोफत नेत्र तपासणी शिबीर, मोफत आरोग्य तपासणी शिबीर व ओव्यांचा कार्यक्रम असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी 8 वाजता रक्तदान शिबीर, मोफत नेत्र तपासणी शिबीर, मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजीत करण्यात आले आहे. सकाळी 11 वाजलेपासून ओव्यांचा कार्यक्रम संपन्न होणार असून दुपारी 2 वाजता शाहीर सत्यवान गावडे यांचा ओव्यांचा कार्यक्रम होणार आहे.
दुपारी 4 वाजता मुख्य कार्यक्रम होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. लक्ष्मण हाके सर हेे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून आ.डॉ. बाबासाहेब देशमुख, मा. आ. दिपकबाबा साळुंखे-पाटील, मा. आ. शहाजीबापू पाटील उद्योगपती बाळासाहेब एरंडे, मनोजदादा सरगर, दादासाहेब लवटे हे उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे आयआरएस सचिन मोटे, दिनेश व्हनमाने (आयकर उपायुक्त), पोलीस निरीक्षक विनोद घुगे, भैय्यासाहेब बंडगर, सौ. स्वातीताई सरगर – कोकरे आदी उपस्थित राहणार आहेत. तसेच रात्री 8 वाजता भव्य मिरवणुक काढण्यात येणार आहे.
तरी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त आयोजीत करण्यात आलेल्या सर्व कार्यक्रमास जुनोनी व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन राजमाता प्रतिष्ठान, जुनोनी यांचेवतीने करण्यात आले आहे.

शाळेची घंटा 16 जून रोजी वाजणार

सांगोला (प्रतिनिधी):- आगामी शैक्षणिक वर्षात उन्हाळ्याची सुटी संपून दि. 16 जून रोजी शाळा सुरू होत आहेत. यासाठी 16 ते 30 जून या कालावधीत जिल्ह्यात शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम प्रभावीपणे साजरा होत आहे 6 ते 14 वर्षे वयोगटांतील सर्व मुलांना (दिव्यांग मुलांसह) शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करण्यात येत आहेत.
नव्याने प्रवेशित होणार्‍या बालकांच्या स्वागतासाठी लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी शाळांना भेटी देणार आहेत. नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ उत्साह, चैतन्य व आनंदमयी होईल अशा पध्दतीने शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात आली आहे.
शाळा सुरू होण्यापूर्वी गावात दवंडी देण्यात येणार आहे. शाळा सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर स्थानिक पातळीवर शिक्षकांमार्फत गृहभेटी देण्यात येतील. शालेय परिसर स्वच्छता करून सडा-रांगोळी काढण्यात येणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा व परिसराची सजावट करून तोरण बांधून गावातील लोकप्रतिनिधी, माजी विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, स्थानिक शासकीय अधिकारी यांच्या सहभागाने पारंपरिक वेशभूषेत, पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करून त्यांना सवाद्य मिरवणुकीने शाळेत आणण्यात येणार आहे.
बालकांना गोड खाऊ वाटप करण्यात येणार आहे. जेणेकरून नवागतांचा उत्साह वाढेल व त्यांच्यामध्ये शाळेबद्दल ओढ निर्माण होईल. सदर शाळांना वर्षभरात वेळोवेळी भेटी देऊन विद्यार्थी गुणवत्ता व शाळेच्या भौतिक सुविधा यांचा आढावा घेऊन मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

नाझरे ग्रामपंचायत मध्ये इंजि.अभिजीत बनसोडे यांचा सत्कार संपन्न

नाझरे (वार्ताहर):- फ्लेक्सर सिस्टीम प्रा.लि. पुणे या कंपनीत अभिजीत संजय बनसोडे यांची सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा नाझरे ग्रामपंचायत मध्ये सत्कार करण्यात आला. यावेळी प्रास्ताविकात शिक्षक नेते अशोक पाटील यांनी सत्काराचा उद्देश सांगितला.
नाझरे ग्रामपंचायत तर्फे विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवून नोकरी सुरुवात करणार्‍या युवकांचा सत्कार होत आहे हे कौतुकास्पद आहे व असाच उपक्रम सुरू ठेवावा असे मत डॉ.तातोबा वाघमारे यांनी व्यक्त केले. सत्कारमूर्ती अभिजीत बनसोडे यांनी सत्कार केलेबद्दल सर्वांचे आभार मानले.
सदर प्रसंगी युवा नेते डॉ. विजय सरगर, माजी सरपंच शामराव आप्पा वाघमारे, ग्राम. सदस्य शशिकांत पाटील, आरटीओ रंगनाथ बंडगर, गोरख भाऊ आदाटे, राजू बंडगर, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख राजू काजी, एकनाथ जावीर, राजू तेली, संजय बनसोडे, पांडुरंग बनसोडे, अरविंद सरगर, बबन पुजारी, प्रकाश सरगर, बंडू मामा आदाटे,बसवेश्वर आदाटे, लक्ष्मण आलदर, सुभाष कोकरे, सचिन कोकरे, राजू पांढरे, बंडू नदाफ, प्रकाश माने, ग्रामपंचायत कर्मचारी काकडे, टिंगरे, गोडसे, अडसूळ, शैलू पवार इत्यादी उपस्थित होते.आभार गोरख बनसोडे यांनी मानले.

गेट-टुगेदरच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी वाटंबरे प्रशालेस दिली वृक्षांची भेट

नाझरा (वार्ताहर):- जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून 2003-2004 या वर्षीच्या वाटंबरे येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल ज्युनिअर कॉलेज या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी गेट-टुगेदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी एक आगळीवेगळी भेट दिली.
या वेळी विद्यार्थ्यांनी पारंपरिक भेटवस्तू किंवा सजावटीऐवजी विद्यार्थ्यांनी शाळेस विविध प्रकारच्या वृक्षांची भेट देत पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी फलदायी व छायादायी अशा विविध प्रजातींची झाडे भेट दिली. यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका नीता पवार व शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी केलेले या उपक्रमाचे कौतुक केले.
आजच्या पिढीकडून मिळालेली ही हिरवी भेट केवळ शाळेस नव्हे, तर पर्यावरणासाठीही अमूल्य आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी पर्यावरणाबाबतची जाणीव आणि जबाबदारी अधोरेखित केलीअसून, समाजात सकारात्मक संदेश दिला असल्याचे मुख्याध्यापिका नीता पवार यांनी सांगितले. यावेळी प्रशालेच्या वतीने उपस्थिती विद्यार्थ्यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार केला गेला. यावेळी पर्यवेक्षक शिवशरण, खंडागळे सर, निकम सर तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग, सर्व विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

विद्यार्थी शिवसेना तालुकाप्रमुख अजिंक्यराणा शिंदे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन

सांगोला (प्रतिनिधी):- सांगोला तालुका विद्यार्थी शिवसेना तालुकाप्रमुख अजिंक्यराणा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार दिनांक 9 जून रोजी सायंकाळी सात वाजता हर्षदा लॉन्स सांगोला येथे अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी हितचिंतक, मार्गदर्शक, नातेवाईक, मित्रपरिवार, सर्व पदाधिकारी यांनी हजर राहावे.

 

 

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon