सांगोला तालुक्यातील आरोग्याच्या प्रश्नाकडे माजी आमदार दिपकआबांनी वेधले लक्ष
सांगोला (प्रतिनिधी):- महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांनी शुक्रवार दि 13 जून रोजी विधान परिषदेचे माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या सांगोला येथील कार्यालयास भेट दिली. यावेळी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी सांगोला तालुक्यातील आरोग्याच्या प्रलंबित प्रश्नांकडे आरोग्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आणि प्रलंबित प्रश्न सोडविण्याची विनंती केली. यावेळी माजी आमदार शहाजीबापू पाटील उपस्थित होते.
सांगोला शहरात कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये आवश्यक अधिकारी कर्मचार्यांची भरती करून लवकरात लवकर हे ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यात यावे. त्याचबरोबर सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयास 100 बेड उपलब्ध करून उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा, तसेच सांगोला तालुक्यात हलदहिवडी आणि खिलारवाडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती बांधून तयार आहेत तरी, या ठिकाणी आवश्यक अधिकारी कर्मचारी उपलब्ध नसल्याने कोट्यवधी रुपयांच्या इमारती बंद अवस्थेत आहेत या ठिकाणी आवश्यक पदभरती करून सदरची प्राथमिक आरोग्य केंद्र सर्वसामान्य लोकांच्या सेवेत सुरू करावेत. आणि सांगोला तालुक्यातील सर्वात मोठे आणि मध्यवर्ती गाव असलेल्या जवळा येथे ग्रामीण रुग्णालय सुरू करावे, महूद येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे नव्याने बांधकाम करावे तसेच आरोग्य अधिकारी आणि आरोग्य सेविका यांच्या सांगोला तालुक्यातील रिक्त जागा तत्काळ भराव्यात अशा मागण्या यावेळी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांच्याकडे केल्या. यावेळी मंत्री प्रकाश आबीटकर यांनी या मागण्याला सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी ज्येष्ठ नेते शिवाजी बनकर, अनिल खडतरे, भाऊसो यमगर, सुनील पाटील, डॉ पियूष साळुंखे पाटील, अॅड.यशराजे साळुंखे, अनिल खटकाळे, मनोज उकळे, सचिन लोखंडे, आलमगीर मुल्ला, सचिन पाटणे, विनोद रणदिवे, दिलीप मोटे, रवी चौगुले, संतोष खडतरे, तौफिक मुजावर, अजित गोडसे, खंडू पाटील आदींसह आजी-माजी लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते.












