Mumbai Indians Lost Because Of Hardik Pandya: हार्दिक पांड्याने कर्णधार म्हणून दोन मोठ्या चुका केल्या.
Hardik Pandya Gamble Backfires: इंडियन प्रिमिअर लीगच्या 56 व्या सामन्यामध्ये वानखेडेच्या मैदानावर मुंबई इंडियन्सच्या संघाचा गुजरातच्या संघाने अगदी शेवटच्या चेंडूवर पराभव केला. गुजरातच्या या विजयासहीत मुंबईच्या संघाचा विजयी अश्वमेध थांबला. मात्र मुंबईच्या हातातोंडाशी आलेला विजयचा घास गुजरातने हिरावून घेण्यामागे मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या कारणीभूत असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे. शेवटच्या चेंडूवर हार्दिकने केलेली एक चूक मुंबईला महागात पडल्याचं सांगितलं जात आहे. तसेच या सामन्यामध्ये कर्णधार म्हणूनही हार्दिकने केलेली एक मोठी चूक शेवटच्या ओव्हरमध्ये निर्णायक ठरली.
शेवटच्या चेंडूवर गुजरातने जिंकला सामना
पावसाने अनेकदा व्यत्यय आणलेला हा सामना मध्यरात्रीनंतर संपला. गुजरातचा संघ 132 वर सहा बाद अशा स्थितीत असताना त्यांना शेवटच्या दोन ओव्हरमध्ये विजयासाठी 24 धावांची गरज होती. मात्र अचानक पाऊस असल्याने खेळ थांबवण्यात आला. पावसाने व्यत्यय आणल्याने एक ओव्हर कमी करुन गुजरातच्या संघासमोर विजयासाठी 147 धावांचं टार्गेट ठेवण्यात आलं. म्हणजेच पावसानंतर टाकण्यात आलेल्या एका ओव्हरमध्ये गुजरातला 6 बॉलमध्ये 15 धावांची गरज होती. शेवटच्या चेंडूवर गुजरातने 15 वी धाव घेत विजयासहीत पॉइण्ट्स टेबलमध्ये अव्वल स्थान मिळवलं.
गुजरात थेट पहिल्या स्थानी
मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 155 धावांपर्यंत मजल मारली. खरं तर मुंबईच्या विल जॅक्सने उत्तम सुरुवात करुन देत वेगवान अर्थशतक झळकावलं. मात्र नंतर मुंबईच्या फलंदाजांनी निराशा केल्याने आठ गड्यांच्या मोबदल्यात मुंबई केवळ 155 पर्यंत पोहोचू शकली. गुजरातच्या संघाने ही धावसंख्या अगदी शेवटच्या चेंडूवर गाठत स्पर्धेतील सातवा विजय मिळवला. सध्या मुंबई आणि गुजरातच्या संघाचे प्रत्येकी 14 गुण आहेत. मात्र मुंबईचा संघ 11 सामने खेळला असून गुजरातने 10 पैकी सात सामने जिंकल्याने ते पॉइण्ट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी आहेत.
दोनदा पाऊस
गुजरातचा कर्णधार शुभमन गीलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईने 20 ओव्हरमध्ये आठ गड्यांच्या मोबदल्यात 155 धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना गुजरातच्या फलंदाजीदरम्यान सामना पावसामुळे दोन वेळा थांबवावा लागला. एकदा 14 व्या ओव्हरमध्ये तर एकदा 18 व्या ओव्हरमध्ये पावसामुळे सामना थांबला. सामन्यामध्ये पावसाचा व्यत्यय आल्याने डकवर्थ-लुईच्या नियमानुसार 19 ओव्हरचा सामना होईल आणि गुजरातने विजयासाठी 147 धावा कराव्यात असं निश्चित करण्यात आलं.
शेवटच्या ओव्हरमध्ये काय घडलं?
शेवटच्या ओव्हरमध्ये गुजरातच्या संघाला विजयासाठी 15 धावा हव्या असताना हार्दिकने दीपक चाहरकडे चेंडू सोपवला. खरं तर हा एक जुगारच होता. मात्र दीपक चाहरला संघाचा विजय मिळवून देता आला नाही. दुसऱ्यांदा थांबलेला सामना सुरु झाला तेव्हा डकवर्थ-लुईस नियमानुसार अंतिम म्हणजेच सामन्यातील 19 व्या ओव्हरच्या आधीच मुंबईला मोठा धक्का बसला. पंचांनी स्लो ओव्हर रेटमुळे मुंबईला पेनल्टी सुनावली. त्यामुळेच 19 व्या ओव्हरमध्ये पाचऐवजी चार खेळाडूच 30 मीटरच्या सर्कलबाहेर फिल्डींगसाठी ठेवावे लागले. कर्णधार म्हणून ठरलेल्या वेळात ओव्हर पूर्ण करुन घेण्याची जबाबदारी कर्णधाराची असते. गुजरातच्या सहा विकेट्स पडलेल्या असताना दीपक चाहर सामना जिंकून देईल असा विश्वास वानखेडेवरील मुंबईच्या चाहत्यांना वाटत होतं. मात्र चाहते आणि हार्दिकचा हा विश्वास चहरला सार्थ करता आला नाही.
शेवटच्या ओव्हरमध्ये गुजरातकडून गेराल्ड कोएत्झी आणि राहुल तेवतिया फलंदाजी करत होते. या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर तेवतियाने चौकार मारला तर तिसऱ्या चेंडूवर गेराल्डने षटकार लगावला. शेवटच्या ओव्हरमध्ये बॉल टू बॉल काय घडलं पाहूयात…
18.1 ओव्हर: राहुल तेवतियाने दीपक चाहरला चौकार लगावला.
18.2 ओव्हर: राहुल तेवतियाने एक धाव घेतली.
18.3 ओव्हर: गेराल्डने दीपक चाहरला षटकार लगावला.
18.4 ओव्हर: नो-बॉल. गेराल्डने एक धाव घेतली.
18.4 ओव्हर: राहुल तेवतियाने एक धाव घेतली.
18.5 ओव्हर: दीपक चाहरने गेराल्डची विकेट घेतली.
18.6 ओव्हर: अरशद खानने एक धाव घेत गुजरातला सामना जिंकून दिला. अरशदला बाद करण्याची संधी हार्दिकने गमावले. त्याने फेकलेला चेंडू स्टम्पला लागलाच नाही.
कर्णधार म्हणून आधी ओव्हर रेट न राखणे तसेच शेवटची ओव्हर चहरला देणे हे निर्णय हार्दिकने चुकवले. तसेच शेवटच्या चेंडूवर रन आऊटचा चान्सही हार्दिकने मीस केला. म्हणूनच पराभवाचं खापर चाहते हार्दिकवर फोडत असून त्याचा फाजील आत्मविश्वास नडल्याची टीका केली जात आहे.







