महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. १ जुलै २०२५ पासून, १५० किमी पेक्षा जास्त अंतराच्या प्रवासासाठी आगाऊ बुकिंग करणाऱ्यांना १५% सूट मिळणार आहे. ही सवलत सर्व प्रकारच्या एसटी बससाठी लागू आहे.
गेल्या काही दिवसांपासून महागाईत सातत्याने वाढ होत आहे. बेस्ट बस, रिक्षा, टॅक्सी या पाठोपाठ आता रेल्वेच्याही तिकिट दरात वाढ करण्यात आली आहे. एकीकडे महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीने दिलासा दिला आहे. एसटीच्या प्रवाशांना आजपासून एसटीच्या तिकिटांवर १५ टक्के सूट देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवासांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) प्रवाशांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. यानुसार १ जुलै २०२५ पासून एसटीच्या लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकिटांवर १५ टक्के सूट देण्यात येणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त ही योजना लागू केली आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि परवडणारा होणार आहे.
सर्व प्रकारच्या बससाठी सवलत लागू
एसटीची ही सवलत आज, १ जुलै २०२५ पासून लागू करण्यात आली आहे. प्रवाशांना १५० किलोमीटरपेक्षा जास्त अंतराच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण केल्यास या सवलतीचा लाभ मिळणार आहे. ही योजना फक्त पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांसाठी लागू असणार आहे. सध्याच्या सवलतधारक प्रवाशांना म्हणजे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी इत्यादींना या योजनेचा लाभ मिळणार नाही. साधी लालपरी, ई-शिवाई, शिवनेरी, सेमी लक्झरी यासह सर्व प्रकारच्या बससाठी ही सवलत लागू असेल.
एसटीच्या प्रवाशांसाठी फायद्याचा निर्णय
दिवाळी आणि उन्हाळी सुट्ट्यांचा कालावधी वगळता वर्षभर ही योजना लागू राहील. या सवलतीचा लाभ गणपती आणि आषाढी एकादशीसाठीच्या आरक्षणावेळीही मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, जादा सोडण्यात येणाऱ्या बसेससाठी ही सवलत लागू असणार नाही. या निर्णयामुळे प्रवाशांना आर्थिकदृष्ट्या मोठा फायदा होणार आहे. तसेच वेळेत बुकिंग करणाऱ्यांना अधिक किफायतशीर दरात प्रवास करणे शक्य होईल. एसटी महामंडळाचा हा निर्णय प्रवाशांच्या फायद्याचा असून यामुळे एसटीच्या सेवेचा अधिक प्रवाशांना लाभ घेता येईल अशी अपेक्षा आहे.