नागपूर, 04 मार्च (हिं.स.) : संतोष देशमुख हत्येप्रकरणी वादात सापडलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आज, मंगळवारी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. हा राजीनामा द्यांनी आधीच द्यायला हवा होता. त्यापेक्षा त्यांचा राजीनामा यापूर्वीच घेतला असता तर बरे झाले असते अशी प्रतिक्रिया त्यांच्या भगिनी आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. नागपुरातील पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभानंतर बोलत होत्या.
यासंदर्भात पंकजा मुंडे म्हणाल्या की, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचे स्वागत आहे. पण हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता. राजीनाम्या आधी शपथच व्हायला नको होती. तर ही गोष्ट झाली नसती. राजीनामा घेणाऱ्यांनी सुद्धा आधीच राजीनामा घ्यायला पाहिजे होता असे पंकजा यांनी सांगितले.
संतोष देशमुख यांच्या हत्येचे काही व्हिडिओ काल सोशल मीडियावरती व्हायरल झाले होते. ते व्हिडिओ उघडून पाहाण्याची सुद्धा माझी हिंमत झाली नाही. संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या केलेल्यांनीच या घटनेचा व्हिडिओ केला आहे. त्या लोकांमध्ये एवढी क्रुरता आहे हे त्या व्हिडिओतून दिसत. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते. त्यात मी माझी भूमिका मांडली होती. या हत्येमध्ये कोण गुंतलेले आहे, कोणाकोणाचा हात आहे, हे फक्त तपास यंत्रणांना माहित आहे. त्यामुळे मी यात हस्तक्षेप करण्याचा काही संबंध नाही.
संतोष देशमुखची हत्त्या करणाऱ्या मुलांच्या मुळे संपूर्ण राज्यातील समाजाची कुठलाही दोष नसताना नाहक बदनामी झाली आहे. संतोष देशमुख यांचा समाज सुद्दा आक्रोशात वावरत आहे. आपल्या राज्यात कुठलीही गोष्ट जातीवर जात जाते. अमानुषपणे एखाद्याला संपवणाऱ्या आणि हल्ला करणाऱ्या लोकांना कुठलीही जात नसते. गुन्हेगारांना जशी कुठली जात नसते तशीच राजकारण्यांना सुद्धा कुठली जात नसते हे लक्षात ठेवले पाहिजे असे पंकजा म्हणाल्या. तसेच या प्रकरणात कुठलाही जातीवाद होण्याचा प्रयत्न होऊ नये. मी संतोष देशमुख यांच्या आईची आणि कुटुंबीयांची हात जोडून माफी मागते. या प्रकरणातल्या गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी हीच माझी मागणी असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले.