महाराष्ट्र काँग्रेसच्या बैठकीत मुंबई महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर चर्चा झाली. पक्षाची संघटन मजबूतीकरणावर भर देण्यात आला असून, अनेक नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी देण्याची शक्यता आहे.
सध्या महापालिका निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, आज ३० जून रोजी राजधानी दिल्लीत महाराष्ट्र काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार, माजी मुंबई अध्यक्ष भाई जगताप, मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आणि काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे असे पाच बडे नेते दिल्लीत दाखल झाले आहेत.
या बैठकीत मुंबई महानगरपालिका तसेच महाराष्ट्रातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सखोल चर्चा होणार आहे. काँग्रेसने यंदाचे वर्ष ‘संघटन पर्व’ म्हणून घोषित केले आहे. या काळात महाराष्ट्रात पक्ष संघटना मजबूत करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. अनेक नेत्यांवर पक्षातील महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे.
मराठी ही फक्त भाषा नाही तर संस्कृती
नुकत्याच आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. हिंदी सक्तीचा विषय नंतरचा भाग आहे. हा शासन निर्णय (GR) रद्द करण्यासाठी आम्ही घेतला होता. एक वादळ तयार करण्यासाठी आणि समाज काय म्हणतो हे चाचपण्यासाठी हा निर्णय घेतला होता,” असे सपकाळ म्हणाले. भाजप बंच ऑफ थॉटच्या अनुषंगाने सरकार चालवत आहे. विविधता ही एकता त्यांना नष्ट करायची आहे. मराठी ही फक्त भाषा नाही तर ही संस्कृती आहे आणि आम्ही भाजपला त्याच्यासोबत खेळू देणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला. हा विषय अधिवेशनात घेतला जाणार हे भाजपला माहीत होते, मात्र ते फ्लोअर मॅनेजमेंटवर चर्चा करायला तयार नसतात, अशी टीकाही त्यांनी केली.
भुसेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवली
शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, असे सरकार निवडणुकीत सांगत होते, त्याचे काय झाले? लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणार होते, त्याचे काय झाले? हे सरकार मुके, बहिरे आणि आंधळे आहे. कृषी मंत्री दादा भुसे यांच्या एका निर्णयावरून सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. “भुसे हे नामधारी मंत्री आहेत, त्यांना याची काहीही माहिती नव्हती. त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवली आहे. देवेंद्र फडणवीस आणि एक अधिकारी यांनी हे सगळे केले आहे. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना याबाबत काहीही माहीत नव्हते,” असे सपकाळ म्हणाले. “महाराष्ट्राचा गाळपत्ता करायचा प्रयत्न हे सरकार करत आहे. क्षेत्रीय अस्तित्व भाजपला मान्य नाही. ‘नमस्ते सदा वत्सले’ म्हणणारा हिंदू ही संकल्पना भाजपला राबवायची आहे,” असा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
भरत गोगावले यांच्या विधानावर सपकाळ यांनी गंभीर प्रतिक्रिया दिली. “त्यांचे हे विधान खूप गंभीर आहे. हे विधान खरे असेल तर नारायण राणे यांना खासदार म्हणून बडतर्फ केले पाहिजे. गोगावले यांच्याकडून माहिती घेऊन ३०२ नुसार राणे यांच्या परिवारावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत,” अशी मागणी त्यांनी केली.
हे सुद्धा वाचा
पाणी पिण्याच्या या 4 सवयी ताबडतोब बदला; चाळीशीतही दिसाल 25 वर्षांचे,डॉक्टरांनीच सांगितलं सिक्रेट
पिकलेली केळी जास्त दिवस ताजी ठेवण्यासाठी ‘या’ सोप्या टिप्सचा करा वापर