Ashok Kharat : कळमण गावातील गट क्रमांक 200/1 मधील 4.48 हेक्टर म्हणजे सुमारे 11 एकरांपेक्षा अधिक जमीन अशोक खरात यांच्या नावावर खरेदी करण्यात आली आहे.
सोलापूर: भोंदूबाबा अशोक एकनाथ खरात (Ashok Kharat) याने पुणे, शिर्डी, नाशिकसह अन्य मोठ्या शहरांमध्ये कोट्यावधींची मालमत्ता खरेदी केल्याची माहिती तपासात समोर आल आहे. आता खरातने सोलापुरात देखील कोट्यावधी रुपयांची मालमत्ता खरेदी केल्याचे समोर आले आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण गावात भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) याने कोट्यावधी रुपयांची जमीन खरेदी केली आहे. कळमण गावातील गट क्रमांक 200/1 मधील 4.48 हेक्टर म्हणजे सुमारे 11 एकरांपेक्षा अधिक जमीन अशोक खरात यांच्या नावावर खरेदी करण्यात आली आहे.28 मार्च 2024 रोजी झालेल्या या व्यवहाराची किंमत तब्बल 2 कोटी 40 लाख 91 हजार 200 रुपये इतकी असल्याची नोंद खरेदीखतात आहे. या व्यवहारात अशोक खरातची पत्नी कल्पना अशोक खरात हिला कुलमुखत्यार म्हणून अधिकार देण्यात आलेले असल्याचेही खरेदी खतात नमूद आहे. विशेष म्हणजे उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण गावातून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. प्राथमिक माहितीनुसार कळमण गावात जमिनीचे साधारण भाव हे प्रति एकर 5-6 लाख रुपये प्रति एकर आहेत. मात्र भोंदू अशोक खरात याने तब्बल 21 ते 22 लाख रुपये प्रति एकर ही जमीन खरेदी केली आहे.(Ashok Kharat)
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण हद्दीत पत्नीच्या नावे जमीन खरेदी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नियोजित शक्तिपीठ महामार्ग कळमण हद्दीतून जाणार असल्याची माहिती मिळाल्याने भोंदूबाबा अशोक खरात याने ही जमीन खरेदी केली असल्याची शक्यता आहे.(Ashok Kharat)
Kalpana Kharat Missing: कल्पना खरात कुठे गायब? 10 दिवसांपासून पोलिसांना चकवा
भोंदूबाबा अशोक खरात याच्या अटकेनंतर आता त्याच्या पत्नीचा, म्हणजेच कल्पना खरातचा (Kalpana Kharat) शोध घेण्यासाठी विशेष तपास पथकाने (SIT) कंबर कसली आहे. शिर्डी पोलीस ठाण्यात (Shirdi Police Station) फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यापासून कल्पना खरात नाशिकमधील (Nashik) राहत्या घरून फरार झाली आहे. 10 दिवस उलटूनही पोलिसांच्या हाती ठोस काहीही लागले नसल्याने, आता तपास यंत्रणेने तिचे नातेवाईक, मित्रपरिवार आणि घरगुती नोकरांकडे तपासाचा मोर्चा वळवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एसआयटीच्या पथकाने कल्पना खरातच्या नाशिकमधील काही जवळच्या मैत्रिणींची चौकशी केली आहे. तसेच, खरातच्या घरी सध्या काम करणारे आणि यापूर्वी काम सोडून गेलेल्या नोकरांकडूनही माहिती घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. कल्पना नेमकी कोणाच्या संपर्कात होती किंवा ती कुठे आश्रय घेऊ शकते? या दिशेने पोलीस तपास करत आहेत.
Who is Kalpana Kharat: कोण आहे ही कल्पना खरात?
कल्पना खरातचे मूळ नाव सुनीता शिंदे आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पाडळी हे तिचे जन्मगाव. तिचे प्राथमिक शिक्षण पाडळी गावात सातवीपर्यंत झाले, तर माध्यमिक शिक्षण ठाणगाव येथील डॉ. अण्णासाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालयात झाले. 1993 साली तिचा विवाह अशोक खरातशी झाला आणि सुनीता शिंदेची ‘कल्पना खरात’ झाली. दोन मुली आणि एक मुलगा असा तिचा परिवार असून, अशोक खरातच्या काळ्या साम्राज्यात तिची मोठी भागीदारी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.








