Sadabhau khot on Rohit Pawar: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे.

Sadabhau Khot on Rohit Pawar: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचे (Baramati By Election 2026) रणशिंग फुंकले गेले असून, राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यास सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या निवडणुकीच्या रिंगणात असून, त्यांच्या प्रचारासाठी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार मैदानात उतरल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. याच मुद्द्यावरून आता आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी रोहित पवारांवर (Rohit Pawar) सडकून टीका केली आहे.
आमदार रोहित पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी ‘घोंगडी बैठका’ घेण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, अजित पवार यांचे गाव असलेल्या काटेवाडीतून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार आणि भगिनी सई पवार देखील उपस्थित होत्या.
Sadabhau Khot on Rohit Pawar: सदाभाऊ खोतांचा ‘पुरोगामी’ टीकेचा बाण
रोहित पवारांच्या या भूमिकेवर सदाभाऊ खोत यांनी ‘एक्स’या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत कडाडून टीका केली आहे. खेळ मांडला खेळ मांडला..! पुरोगामीपणाचा खेळ मांडला..!! सत्तेच्या सारीपाटावर स्वयंघोषित पुरोगामी धृतराष्ट्र बनला..! पुरोगाम्यांनो, आम्ही पुरोगामीपणाचा खेळ मांडीला! सत्तेच्या जोरावरती, कधी भावनेच्या लाटेवरती, कधी जातीवादाच्या नावावरती पुरोगामीपणाचा खेळ मांडला, असे म्हणत त्यांनी रोहित पवार यांच्यावर हल्लाबोल केलाय.
Rohit Pawar: प्रचारावेळी काय म्हणाले रोहित पवार?
रोहित पवारांनी यांनी प्रचारावेळी म्हटले होते की, आजपर्यंत प्रचार असेल तर तो साहेबांचा असायचा, दादांचा असायचा. मी लहान असताना मी अजितदादांच्या प्रचारासाठी सायकल रॅली काढली होती. दादांनी मला जिल्हा परिषदला तिकीट दिलं होतं. त्यावेळी दादा निर्णय घेत होते. मी इथून उभा राहिलो होतो. आज पवार साहेबांमुळे हा परिवार आहे, पण नंतरच्या काळात अनेक नेते आहेत, महाराष्ट्रात जे अजितदादांमुळे आहेत, आल्या आल्या अजित दादांच्या फोटोला हात जोडावे लागतील असं स्वप्नात वाटलं नव्हतं. आता आपला नेता पुन्हा दिसणार नाही. मी दुसऱ्या पक्षात असलो तरी दादांचा मी फॅन होतो, ते माझे काका होते. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी पवार साहेबांपासून अनेकांनी प्रयत्न केले. मोठ्या पक्षांनी उमेदवार दिला नाही. पण अपक्ष उमेदवार आहेत त्यांनी उभा राहायला नको होतं, आपल्या गावातून एक सुद्धा मत अपक्ष उमेदवारांना होणार नाही याचा प्रयत्न आपण सर्वांनी करावा. सर्व ९९ टक्के मतदान सुनेत्रा पवारांना होईल यासाठी प्रयत्न करा, असे त्यांनी सांगितले.








