सांगोला: (प्रतिनिधी)- क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त सांगोला शहरात 10 आणि 11 एप्रिल 2026 रोजी भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षीपासून महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी (200 व्या) जयंती वर्षाचा शुभारंभ होत असल्याने महात्मा फुले जयंती उत्सव मंडळ, सांगोला यांच्या वतीने दोन दिवसीय विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.
या महोत्सवाची सुरुवात शुक्रवार 10 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता सांस्कृतिक गजी ढोल कार्यक्रमाने होईल. सायंकाळी 7 वाजता राऊतमळा येथील ’मायाक्का-बिरुदेव ओवीकार मंडळाचा ओव्यांचा कार्यक्रम रंगणार आहे.
शनिवार, 11 एप्रिल रोजी जयंतीच्या मुख्य दिवशी सकाळी 8:30 वाजता भव्य मोटारसायकल रॅली व पदयात्रा काढण्यात येईल. त्यानंतर 10 वाजता सामूहिक पुष्पहार अर्पण व गुणवंतांचा सत्कार सोहळा होईल. सकाळी 10:30 वाजता अहिल्यानगर येथील प्रसिद्ध व्याख्यात्या सौ. सुनिता अशोक दरवडे-गदादे यांचे महात्मा फुले यांच्या जीवनावर व्याख्यान होईल. व्याख्यानानंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.
दुपारी 12 वाजता सामाजिक बांधिलकी म्हणून भव्य रक्तदान शिबिर आयोजीत करण्यात आले आहे. महोत्सवाचा समारोप सायंकाळी 4 वाजता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणुकीने होणार आहे. या मिरवणुकीत सजीव देखावे, विझोरीचा हलगी ग्रुप, पेपर ब्लास्ट, नयनरम्य आतिषबाजी आणि सुपर बँजो ही मुख्य आकर्षणे असतील. हे सर्व कार्यक्रम सांगोला येथील महात्मा फुले चौक येथे पार पडणार आहेत.
तरी सांगोला शहर व तालुक्यातील नागरिकांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उत्सव मंडळाने केले आहे.