Ajit Pawar Case Zero FIR: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात बंगळुरू (कर्नाटक) पोलिसांनी ‘झीरो एफआयआर’ दाखल केला आहे.
कर्नाटक सरकारने दाखल केलेल्या झीरो एफआयआरमध्ये काय? (Ajit Pawar Case Zero FIR)
कर्नाटकातील बेंगळुरू येथे नोंदवण्यात आलेल्या ‘Zero FIR’ मध्ये अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत गंभीर आरोप नोंदवण्यात आले आहेत. ही तक्रार त्यांच्या पुतण्याने रोहित पवार यांनी दाखल केली असून, या अपघातामागे केवळ तांत्रिक बिघाड नसून मोठ्या प्रमाणावर कटकारस्थान (criminal conspiracy) असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. FIR मध्ये भारतीय न्याय संहितेअंतर्गत खून, निष्काळजीपणामुळे मृत्यू, कटकारस्थान, पुरावे नष्ट करणे आणि बनावट कागदपत्र तयार करणे यांसारख्या गंभीर कलमांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच तक्रारीत विमानाच्या सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे नमूद केले असून, उड्डाणाच्या वेळी आवश्यक असलेल्या दृश्यता मर्यादेपेक्षा कमी परिस्थितीत लँडिंगला परवानगी देण्यात आली होती, असा आरोप आहे. याशिवाय विमानाच्या वापराच्या तासांमध्ये विसंगती (अधिकृत नोंदी आणि प्रत्यक्ष वापर यात फरक), पायलटची शेवटच्या क्षणी केलेली बदल, तसेच संबंधित पायलटच्या शिस्तभंगाच्या इतिहासाबाबतही शंका व्यक्त करण्यात आली आहे. या सर्व बाबींमुळे अपघात हा केवळ दुर्घटना नसून गंभीर निष्काळजीपणा आणि संभाव्य गैरव्यवहारामुळे घडलेली घटना असू शकते, म्हणून सखोल गुन्हेगारी तपास करण्याची मागणी या झीरो एफआयआरमध्ये करण्यात आली आहे.
झीरो एफआयआर म्हणजे काय? (What Is Zero FIR)
जेव्हा एखादी तक्रार घटनास्थळाच्या हद्दीत नसलेल्या पोलीस ठाण्यात नोंदवली जाते, तेव्हा त्याला ‘झीरो एफआयआर'(Zero FIR) म्हणतात. यावर ‘0’ नंबर टाकला जातो, कारण त्याचा अनुक्रमांक नंतर मूळ पोलीस ठाण्यात निश्चित होतो. झीरो एफआयआर म्हणजे गुन्हा कोणत्याही पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेला असो, तो कोणत्याही पोलीस ठाण्यात नोंदवला जाऊ शकतो. हे एक महत्त्वपूर्ण कायदेशीर साधन आहे, जे तातडीने तपासाला सुरुवात करण्यासाठी आणि पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी, घटनास्थळाच्या हद्दीचा वाद न घालता तक्रार स्वीकारण्याची परवानगी देते, ज्याची नंतर मूळ पोलीस ठाण्याकडे बदली केली जाते.











