रिक्षावाल्या भजनलालनं सांगितला मध्यरात्रीचा तो भयानक प्रसंग
‘मै सैफ अली खान हूं, जल्दी स्ट्रेचर लाओ…’
गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून एका अज्ञात व्यक्तीनं त्याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली. या व्यक्तीनं त्याच्यावर चाकूनं सहा वार केले. या हल्ल्यामध्ये सैफ अली खान गंभीर जखमी झाला. सध्या त्याच्यावर मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान सैफवर जेव्हा हल्ला झाला, तेव्हा त्याला रिक्षामधूनच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या रिक्षाचा मालक असलेल्या भजनलाल यांची प्रतिक्रिया आता समोर आली आहे, त्यावेळी नेमकं काय घडलं होतं याची माहिती त्यांनी दिली.
नेमकं काय म्हणाले भजनलाल?
एक व्यक्ती गेटमधून बाहेर आला, त्याच्यासोबत एक मुलगा देखील होता. त्याने पांढऱ्या कलरचा ड्रेस घातलेला होता. त्याचा शर्ट पूर्णपणे रक्तानं माखलेला होता. तो माझ्या रिक्षात येऊन आरामात बसला. मला लिलावती रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आले. मी पाच ते सहा मिनिटांमध्ये रिक्षा घेऊन लिलावती रुग्णालयात पोहोचलो. परंतु तोपर्यंत मला माहिती नव्हते की तो सैफ अली खान आहे. जेव्हा माझी रिक्षा रुग्णालयाबाहेर पोहोचली तेव्हा तो खाली उतरला आणि जोरात ओरडला ‘मै सैफ अली खान हूं, जल्दी स्ट्रेचर लाओ’ तेव्हा मला कळालं की आपल्या रिक्षामध्ये सैफ अली खान बसला होता. मी त्याला रिक्षानं रुग्णालयात पोहोचवलं. मी त्याच्याकडून कोणतेही पैसे घेतले नाहीत. त्याचा जीव वाचला याचं मोठं समाधान आहे अशी प्रतिक्रिया यावेळी भजनलाल यांनी दिली.
नेमकं काय घडलं होतं?
गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमासार अंदाजे दोन ते अडीच वाजता सैफच्या घरात दबा धरून बसलेल्या एका व्यक्तीचे आणि त्याच्या घरात काम करणाऱ्या महिलेचा वाद सुरू झाला. हा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या सैफसोबत या व्यक्तीची झटापट झाली. त्यानंतर त्या व्यक्तीनं सैफवर आपल्या हातातील चाकूनं हल्ला केला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर एकूण सहा वार करण्यात आले आहेत. त्याच्यावर सध्या लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.