बीड पुन्हा हादरले; नातेवाईकच जीवावर उठला, 2 सख्ख्या भावांना संपवलं
बीड मधील आष्टी तालुक्यातील वाहिरा परिसरात दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या करण्यात आल्याने मोठी खळबळ माजली आहे. पारधी समजातील दोघांची हत्या झाली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या दोन तरूणांच्या नातेवाईकानेच त्यांचा निर्घृणपणे चाकूने खून केल्याचे समोर आले आहे. यामुळे आष्टी तालुक्यातील वाहिरा भागातील नागरिकांमध्ये दहशतचे वातावरण असून ते जीव मुठीत धरून जगत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजय भोसले ( वय 30) आणि भरत भोसले ( वय 32) अशी मृत तरूणांची नावे आहेत. अजय आणि भरत यांचा त्यांच्या एका नातेवाईकासोबत जुना वाद होता. आणि याच वादातून रात्री निर्घृणपणे या दोघांची हत्या झाली. दोघे भाऊ नगर हद्दी वरील हातवळण या मूळ गावचे आहेत. या गावापासून पाच किलोमीटर अंतरावर वाहीरा गावच्या परिसरात या दोघांची हत्या झाली. वादातून त्यांच्या नातेवाईकानेच त्यांच्यावर चाकूने हल्ला केला आणि त्यांचा जीव घेतला. यामुळे मोठी खळबळ माजली आहे.
अजय आणि भरत या दोघांचे मृतदेह आष्टी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले असून पोस्टमॉर्टम करण्यात येईल. या प्रकरणी संशयित चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अंभोरा पोलीस अधिक तपास करत आहेत. खून नेमका कधी , कसा केला, काय वाद होता याची पोलिसांकडून अधिक चौकशी करण्यात येत आहे.