पुण्यात सुरू असलेल्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट देण्यासाठी अभिनेत्री आणि शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद आंदोलनस्थळी पोहोचल्या. मात्र, विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला.
पुण्यातील एस. एम. जोशी पुलाखाली गेल्या काही दिवसांपासून MPSC परीक्षेतील कथित गैरप्रकार आणि विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. आमदार रोहित पवारही विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलनात सहभागी झाले आहेत.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना पाठिंबा देण्यासाठी दिपाली सय्यद आंदोलनस्थळी गेल्या होत्या. मात्र, त्यांच्या वक्तव्यावर विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे आंदोलनस्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
MPSC परीक्षांमधील कथित पेपरफुटी, भरती प्रक्रियेतील अडचणी आणि आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी यांसारख्या मुद्द्यांवर विद्यार्थी ठाम आहेत. या प्रश्नांवर सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अशी आंदोलकांची मागणी आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच असून या प्रश्नावर सरकार आणि आंदोलकांमध्ये तोडगा कधी निघणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






