गणपती विसर्जनाच्या दिवशी नालासोपाऱ्यातील कळंब समुद्रकिनारी एक चिंताजनक घटना घडली आहे. सोशल मीडियावर रील आणि व्हिडीओमुळे लोकप्रिय असलेला कृष्णा विश्वकर्मा समुद्रात बेपत्ता झाला आहे. शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्याचा अद्याप शोध लागलेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, अनंत चतुर्दशीच्या दिवशी कृष्णा विश्वकर्मा आपल्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत कळंब समुद्रकिनारी गेला होता. यावेळी तो व्हिडीओ बनवण्यासाठी समुद्राच्या पाण्यात उतरला. सुरुवातीला पाणी कमी असल्याचे दिसत असले तरी पुढे जाताना तो खोल पाण्यात पोहोचला आणि काही वेळाने अचानक दिसेनासा झाला.
कृष्णा नालासोपारा येथील संतोष भवन परिसरातील दुर्गा माता मंदिराजवळील गुरुकृपा अपार्टमेंटमध्ये राहत असल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर रील्स आणि व्हिडीओ बनवत असल्याने तो परिसरात परिचित होता.
कृष्णा नेमका कोणत्या ठिकाणी आणि कशामुळे बेपत्ता झाला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. कुटुंबीयांनी ज्या ठिकाणी तो पाण्यात उतरला, तिथे खोल खड्डा असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र, या कारणाची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि वसई-विरार महापालिका अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. जीवरक्षक आणि बचाव पथकाच्या मदतीने कृष्णाचा समुद्रात शोध घेण्यात येत आहे. मात्र, समुद्रातील पाण्याचा वेग आणि परिस्थितीमुळे शोधकार्यात अडथळे येत असल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, कृष्णा बेपत्ता झाल्याने त्याचे कुटुंबीय, मित्र आणि परिचितांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून त्याचा शोध सुरू असून, त्याच्या स्थितीबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.









