टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

राज्यातील शेतकऱ्यांसाठी परदेश अभ्यास दौरा योजना; अर्ज करण्याचे आवाहन

Follow Us:

– युरोप व चीनमध्ये आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्याची संधी

सोलापूर : राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, उत्पादनाची गुणवत्ता सुधारणा आणि जागतिक स्तरावरील कृषी पद्धतींचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, या उद्देशाने राज्य शासनाच्या राज्यपुरस्कृत योजना २०२६-२७ अंतर्गत शेतकऱ्यांसाठी परदेश अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी अभ्यास दौऱ्यासाठी युरोप आणि चीन या देशांची निवड करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत लाभ घेणारा अर्जदार स्वतः शेतकरी असणे,  ॲग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी असणे, शेती हेच उत्पन्नाचे मुख्य साधन असणे, वैध पासपोर्टधारक असणे तसेच शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. अर्ज सादर करताना पासपोर्टची किमान एक वर्ष वैधता असणे बंधनकारक आहे. तसेच संबंधित शेतकरी शासकीय, निमशासकीय, सहकारी अथवा खासगी संस्थेत नोकरी करणारा नसावा तसेच डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट, अभियंता, कंत्राटदार आदी व्यवसायातील नसावा.

शासनाकडून अभ्यास दौऱ्यासाठी एकूण खर्चाच्या ५० टक्के रक्कम किंवा कमाल दोन लाख रुपये, यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढे अनुदान देण्यात येणार आहे.

या योजनेसाठी सोलापूर जिल्ह्यास पाच शेतकऱ्यांचा लक्षांक देण्यात आला असून त्यामध्ये एक महिला शेतकरी तसेच केंद्र किंवा राज्यस्तरीय कृषी पुरस्कारप्राप्त अथवा पीक स्पर्धा विजेत्या एका शेतकऱ्याची निवड करणे अनिवार्य आहे. अर्जांची संख्या लक्षांकापेक्षा जास्त असल्यास जिल्हास्तरीय समितीसमोर सोडत काढून ज्येष्ठता क्रमवारीनुसार लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे.

इच्छुक शेतकऱ्यांनी दि. १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावेत. तसेच अर्ज केलेल्या शेतकऱ्यांनी दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ४.०० वाजता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, सोलापूर येथे उपस्थित राहावे. प्राप्त अर्जांची जिल्हास्तरीय समितीसमोर सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिली असून, जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकरी बांधव व भगिनींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

 

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now