
TOP 10 News: 1. दिलासादायक! व्यावसायिक एलपीजी सिलेंडर स्वस्त
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांसह व्यावसायिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी १९ किलोग्रॅमच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात केली आहे. यामुळे व्यावसायिक गॅस सिलेंडर तब्बल २०९ रुपयांपर्यंत स्वस्त झाला आहे. मात्र घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दरम्यान, २०२६ च्या सुरुवातीपासूनच आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर मार्च ते मे दरम्यान सिलेंडरचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले होते. दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलेंडर दर ३,०७१.५० रुपयांवर गेले होते. मात्र, जुलै आणि ऑगस्ट महिन्यांतील सलग कपातीमुळे आता व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.
2. MPSCमध्ये टॉपर ठरलेले अधिकारी लाच घेताना पकडले
बीडमध्ये सामाजिक वनीकरण विभागात कार्यरत असलेले अधिकारी श्रीनिवास लखमावाड यांना तब्बल ४५ लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात अटक केली आहे. पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बैठकीनंतर घरी परतताच एसीबीने सापळा रचून ५ लाख रुपयांच्या खऱ्या आणि ४० लाखांच्या खोट्या नोटांची रक्कम स्वीकारताना लखमावाड यांच्यावर ही कारवाई केली. वृक्षलागवडीची बिले मंजूर करणे, थकीत वेतन देणे आणि निलंबन मागे घेण्यासाठी लखमावाड यांनी ही लाच मागितली होती. या संदर्भात एका तक्रारदाराने 29 जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर एसीबीकडे अधिकृत तक्रार नोंदवली होती. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने बीडमध्ये सापळा रचला. मूळचे नांदेडचे असणारे बी.टेक पदवीधर लखमावाड हे २०१६ च्या एमपीएससी वनसेवा परीक्षेत अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातून राज्यात पहिले आले होते. याप्रकरणी बीडच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

3. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुण्यात दौऱ्यावर आहेत. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने यंदाचा टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026 देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळ्याला गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहतील. तसेच अण्णाभाऊ साठे जयंती निमित्ताने सारसबाग चौकातील अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह भेट देत अभिवादन करणार आहेत. अमित शाह यांच्या पुणे दौऱ्यासाठी प्रशासनाकडून जोरदार तयार करण्यात आली आहे. दुसरीकडे, अमित शहा यांच्या नियोजित पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित मारहाणीच्या निषेधार्थ काँग्रेसकडून आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. तर या आंदोलनाला जशास तसे उत्तर देण्याचा इशारा भाजपने दिल्याने दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
4. राज्यात आजही पावसाचा जोर कायम
राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. विशेषतः कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या दोन्ही जिल्ह्यांसाठीही येलो अलर्ट लागू करण्यात आला आहे. तर हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर नाशिक आणि नंदूरबार जिल्ह्यातील अंगणवाडी, शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज रायगड जिल्ह्यासह नाशिक आणि पुणे जिल्ह्यांच्या घाटमाथा भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. याशिवाय ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर घाटमाथा परिसरासाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे.
5. सिंहगड किल्ल्यावर जाण्याच्या प्लॅनला ब्रेक!
शनिवार-रविवार सुट्टीचा आनंद घेण्यासाठी जर तुम्ही सिंहगड किल्ल्यावर जाण्याचा बेत आखत असाल, तर जरा थांबा… पावसाचा जोर पाहता पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पुणे वन विभागाने शनिवार आणि रविवारी (१ आणि २ ऑगस्ट) सिंहगड किल्ला पर्यटनासाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सिंहगड घाटातील काही भाग हा अत्यंत दरडप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. मुसळधार पावसामुळे दुर्घटना घडण्याचा मोठा धोका आहे. मुसळधार पावसामुळे मोठी झाडे रस्त्यावर येऊ शकतात. तसंच डोंगरावरून दगड थेट रस्त्यावर येऊन वाहतूक ठप्प किंवा अपघात होऊ शकतो. याच कारणामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. समजा, मुख्य रस्त्याशिवाय पायवाटा किंवा इतर कोणत्याही चोरट्या वाटेने अतिसाहस करून गडावर चढण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

6. एकता नगर पुन्हा पाण्यात! घोषणा फक्त कागदावरच
सिंहगड रस्ता परिसरातील एकतानगरी, विठ्ठलनगर आणि निंबजनगरमधील रहिवाशांना दरवर्षी पावसाळ्यात पुराच्या धोक्याला सामोरे जावे लागत असतानाही त्यांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाचे आणि नदीकाठ संरक्षणाचे प्रस्ताव गेली दोन वर्षे केवळ कागदावरच राहिले आहेत. राज्यशासन आणि महापालिकेच्या उदासीनतेमुळे या भागातील नागरिकांना पुन्हा एकदा पूरस्थितीमुळे आर्थिक नुकसान, तसेच मनस्तापाचा सामना करावा लागला आहे. २५ जुलै २०२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मुठा नदीला आलेल्या पुरात या परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले होते. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे यांनी या भागासाठी ठाणे शहराच्या धर्तीवर क्लस्टर उभारून नागरिकांचे पुनर्वसन करण्याची घोषणा केली, तसेच महापालिकेने तातडीने अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या. महापालिकेनेही तत्काळ प्रस्ताव तयार करत नगरविकास विभागाच्या मान्यतेसाठी पाठवला. मात्र, त्यावर साधी चर्चाही झालेली नाही.

7. “माझ्यासह आईलाही शिवीगाळ केलेल्या मुलांना…”; पंतप्रधान मोदींचा नवा व्हिडिओ
पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी रात्री उशिरा सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. ज्यात त्यांनी जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलनादरम्यान आपल्यासह आपल्या दिवंगत आईलाही शिवीगाळ करण्यात आल्याचे सांगितले. मात्र, या ‘दिशाभूल झालेल्या मुलांना’ न्यायालयात खेचून किंवा शिक्षा करून प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे त्यांना माफ करायचे आहे, अशी भूमिका मोदी यांनी मांडली. ‘मला त्यांना माफ करायचे आहे. माणसांकडून चुका होतात. मात्र, आपल्या मुली अशा प्रकारची अपशब्दांची भाषा वापरत आहेत, हा संस्कृतीला धक्का आहे. अखेर ती आपलीच आहेत. त्यांना योग्य मार्ग दाखवणे हे आपले कर्तव्य आहे. समाजात असलेली नाराजी आणि अस्वस्थता आपण समजू शकतो. मात्र, तरुणांना जवळ घेऊन त्यांना योग्य मार्ग दाखवण्याची ही वेळ आहे,’असे मोदी म्हणाले. या मुलांना शिक्षा करणे किंवा न्यायालयीन प्रक्रियेतून जावे लागणे हा या समस्येवरील उपाय नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
8. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा इराणला थेट इशारा
मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. या चर्चेदरम्यान भारताने प्रादेशिक अस्थिरतेबद्दल गंभीर चिंता व्यक्त करत, कोणत्याही परिस्थितीत व्यापारी जहाजे आणि खलाशांवर होणारे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत, असा स्पष्ट इशारा दिला. जयशंकर यांनी ‘एक्स’ वर पोस्ट करत नमूद केले की, व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांचा भारत तीव्र निषेध करतो. सध्याच्या संघर्षातून मार्ग काढण्यासाठी शांतता, संवाद हाच एकमेव योग्य पर्याय आहे. सर्व संबंधित पक्षांनी संयम बाळगून शांततापूर्ण मार्ग स्वीकारावा, अशी भूमिका भारताने पुन्हा एकदा मांडली, असंही त्यांनी स्पष्ट केलं. तत्पूर्वी, जयशंकर यांनी युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांकडेही ब्लॅक सी भागातील सागरी सुरक्षिततेबाबत चिंता मांडली होती. भारताने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय सागरी वाहतूक सुरक्षित ठेवण्यासाठी आणि शांततापूर्ण मार्गाने प्रश्न सोडवण्यासाठी सर्व देशांनी संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.
9. भालाफेकमध्ये भारताने जिंकली दोन पदके
कॉमनवेल्थ गेम्स 2026 मधील पुरुष भालाफेक प्रकारात भारताने दुहेरी यश मिळवले आहे. भारताचा स्टार भालाफेकपटू आणि माजी ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राने रौप्य पदक जिंकले, तर नवख्या यशवीर सिंगने कांस्य पदक आपल्या नावावर केले. तर श्रीलंकेच्या तरुण भालाफेकपटू रुमेश थरंगा पथिरागाने नीरजला मागे टाकत सुवर्णपदकावर नाव कोरले. शुक्रवारी पार पडलेल्या या हाय-व्होल्टेज अंतिम फेरीत नीरजने दुसऱ्या प्रयत्नात 85.83 मीटर लांब भालाफेक करत थेट अव्वल स्थान पटकावले. गंभीर दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या नीरजचा या हंगामातील हा सर्वोत्तम थ्रो ठरला. परंतु, त्याच फेरीत श्रीलंकेच्या रुमेश थरंगा पथिरागा याने तब्बल 89.73 मीटरचा थ्रो करत नीरजच्या पुढे गेला. त्यानंतरच्या चार फेऱ्यांमध्ये नीरज किंवा इतर कोणत्याही खेळाडूला पथिरागाचा हा विक्रम मोडता आला नाही.
10. “शिवीगाळ करायची आणि रात्री पार्ट्या करायच्या”; मुकेश खन्ना संतापले
दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान काही विद्यार्थ्यांच्या वागणूकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. अनेकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी वापरण्यात आलेल्या आक्षेपार्ह भाषेवर टीका केली. यावर ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांनी, “आंदोलनाच्या नावाखाली पंतप्रधान आणि त्यांच्या दिवंगत मातोश्रींबद्दल ज्या प्रकारे अत्यंत नीच आणि गलिच्छ भाषेचा वापर करण्यात आला, ते पाहून माझे मन हेलावलं आहे. हे आंदोलन उत्स्फूर्त नसून पूर्णपणे नियोजीत होतं आणि यामागे मोठे राजकीय हेतू होते. हे लोक सरकार पाडण्याचे मनसुबे घेऊन आले होते. दिवसभर घोषणाबाजी करायची, शिवीगाळ करायची आणि रात्री पार्ट्या करायच्या, हे खऱ्या विद्यार्थ्यांचं लक्षण असू शकत नाही. पैशांसाठी देशात अस्थिरता निर्माण करू पाहणाऱ्यांचा हा कट आहे”, असा गंभीर आरोप केला आहे.












