महूद, ता.२१ : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) आणि मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) या दोन्ही कामांच्या तीव्र ताणतणावामुळे सांगोला तालुक्यातील खिलारवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका उज्वला हनुमंत काळेल-खिलारे (वय ४३) यांचे मेंदूतील रक्तस्त्रावाने निधन झाले.त्यांच्या या अचानक जाण्याने शिक्षण क्षेत्रात व गावातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
खिलारवाडी (ता. सांगोला) अंतर्गत असलेल्या चौगुलेवस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उज्वला काळेल-खिलारे यांची प्राथमिक शिक्षक मणून १९ वर्षे झाली होती.सुमारे १९ वर्षे सेवा झाल्यानंतरही त्यांना शिक्षक पात्रता परीक्षा(टीईटी) देणे अनिवार्य झाले होते.शाळा आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून त्या ऑनलाईन क्लासद्वारे या परीक्षेचा अभ्यास करत होत्या.मात्र ऐनवेळी टी.ई.टी.चा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द झाली.यामुळे पुन्हा अभ्यास कसा करायचा?या विचाराने त्या मोठ्या मानसिक दडपणाखाली होत्या.
त्यातच खिलारवाडी येथील मतदान केंद्र क्रमांक ६६ साठी ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ (SIR) कामात त्यांची सहाय्यक म्हणून नेमणूक करण्यात आली होती.या कामासाठी वरिष्ठ कार्यालयाकडून वारंवार तंबी व सूचना दिल्या जात होत्या.शनिवारी (ता. १८) नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यानंतर त्या ‘एस.आय.आर.’च्या कामासाठी बाहेर पडल्या.सायंकाळी सव्वापाच वाजेपर्यंत काम आटोपून त्या घरी पोहोचल्या.घरी पोहोचताच साडेपाचच्या सुमारास त्यांना रक्ताची उलटी झाली.

कुटुंबियांनी त्यांना तात्काळ महूद येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना पंढरपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले.उपचारादरम्यान पंढरपूर येथे पुन्हा मेंदूला दुसरा धक्का बसल्याने शनिवारी रात्री ९ च्या सुमारास त्यांचा ‘ब्रेन डेड’ (मेंदू मृत) झाला.उपचार सुरू असतानाच मंगळवारी (ता.२१) हृदय बंद पडून त्यांची प्राणज्योत मालवली.एक आदर्श आणि विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून त्यांची ओळख होती.कामाचा अतिरिक्त ताण आणि प्रशासकीय दडपणामुळेच त्यांचा बळी गेल्याची भावना शिक्षकांमधून व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पती माध्यमिक शिक्षक कमलाकर खिलारे आणि दोन मुले असा परिवार आहे.मंगळवारी दुपारी खिलारवाडी येथील त्यांच्या शेतात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
















