Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेची निवडणूक येत्या 12 तारखेला होत आहे. भाजपच्या वाट्याला 5 जागा, केशव उपाध्येंना संधी मिळणार असल्याची जोरदार चर्चा.

Vidhan Parishad Election 2026 BJP: आगामी विधानपरिषद निवडणुकीच्यानिमित्ताने महाराष्ट्रातील राजकारणात रंगत निर्माण झाली आहे. विधान परिषदेच्या (Vidhanparishad Election 2026) नऊ जागांसाठी येत्या 12 मे रोजी निवडणूक होणार आहे. या नऊ जागांपैकी भाजपच्या वाट्याला पाच जागा येणार आहेत. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील भाजपच्या (BJP) कोअर कमिटीने तब्बल 30 जणांच्या नावांची यादी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे पाठवली होती. मात्र, ही यादी पाहिल्यानंतर दिल्लीतील वरिष्ठांनी या यादीमधील अर्धी नावे काढून पुन्हा सुधारित यादी पाठवण्यास सांगितले होते. त्यानुसार आता महाराष्ट्र भाजपने विधानपरिषद निवडणुकीसाठी 14 जणांच्या नावांची सुधारित यादी पुन्हा दिल्लीला पाठवली आहे. त्यामुळे 30 जणांपैकी नक्की कोणाचा पत्ता कट झाला, याबद्दल आता उत्सुकता निर्माण झाली आहे. (Maharashtra Politics news)
विधानपरिषद निवडणुकीत उमेदवारी मिळावी, यासाठी भाजपमध्ये सध्या प्रचंड रस्सीखेच सुरु आहे. अनेकजण उमेदवारी मिळण्यासाठी देव पाण्यात बुडवून बसले आहेत. एखाद्या इच्छूकाला उमेदवारी न मिळाल्यास नाराजीनाट्य रंगण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून भाजपने आता उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 30 एप्रिललाच उमेदवारी यादी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, विधानपरिषदेसाठी मुंबई वगळता राज्यातील पाच विभागांमधून संधी दिली जाणार आहे. पक्षातील जुन्या आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे आता भाजपमधून कोणाला विधानपरिषदेची उमेदवारी मिळणार, याबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

दरम्यान, विधानपरिषदेसाठीच्या 14 उमेदवारांची नावे दिल्लीला पाठवल्यानंतर स्वत: प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हेदेखील दिल्लीला रवाना झाले आहेत. आता दिल्लीत भाजपच्या केंद्रीय नेत्यांशी चर्चा करुन 5 उमेदवारांची नावं निश्चित करतील. पुढील काही तासांमध्ये भाजपची विधानपरिषद उमेदवारांची यादी अंतिम होण्याची शक्यता आहे.
BJP Vidhan Parishad Election 2026 Candidates list: भाजपचे विधानपरिषद निवडणुकीतील संभाव्य उमेदवार कोण?
भाजपने लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत पराभूत झालेल्यांना विधानपरिषदेवर संधी द्यायची नाही, असे धोरण स्वीकारल्याची माहिती आहे. याउलट संघटनेत काम करणाऱ्या नव्या चेहऱ्यांना आणि जातीय समीकरणे साधणाऱ्या उमेदवारांना संधी देण्याचे भाजपने घेतला होता. त्यानुसार, माधवी नाईक, डॉ. उपेंद्र कोठेकर, मनोज कोटक, केशव उपाध्ये, रवी अनासपुरे, राजेश पांडे, दयाशंकर तिवारी, राम सातपुते, रणजितसिंह निंबाळकर, संजय काका पाटील, विवेक कोल्हे, जगदीश मुळीक, प्रमोद जठार, संजय केणेकर, अर्चना पाटील चाकूरकर, दादाराव केचे, संजय भेंडे यांची नावं उमेदवारीच्या शर्यतीत आहेत.












