टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

बिर्याणीनंतर खाल्लं कलिंगड, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, त्या रात्री नेमकं काय घडलं? नातेवाईकांनी सांगितला घटनाक्रम

Follow Us:

मुंबईतील पायधुनी परिसरात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. बिर्याणी खाल्ल्यानंतर या चौघांनी कलिंगड खाल्ला होता. त्यानंतर पहाटेच्या सुमारास त्यांना उलट्या आणि जुलाबचा त्रास होऊ लागला होता. त्या रात्री नेमकं काय घडलं होतं, ते जाणून घ्या..

बिर्याणीनंतर खाल्लं कलिंगड, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, त्या रात्री नेमकं काय घडलं? नातेवाईकांनी सांगितला घटनाक्रम

मुंबईतील पायधुनी इथं एकाच कुटुंबातील चार जणांचा रविवारी रात्री विषबाधेनं मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये पती, पत्नी आणि दोन मुलींचा समावेश आहे. विषबाधा झालेल्या या चौघांना तातडीने जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रविवारी पहाटे साडेपाच, सहा वाजताच्या सुमारास या चौघांनाही उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला होता. 25 एप्रिल रोजी या चौघांनी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास नातेवाईकांसह एकत्र जेवण केलं होतं. बिर्याणी खाऊन नातेवाईक आपल्या घरी परतले, त्यानंतर मध्यरात्री या चौघांनी कलिंगड खाल्लं. अब्दुल्ला डोकाडिया, नसरीन डोकाडिया आणि त्यांच्या मुली आयशा, झैनब अशी मृतांची नावं आहेत. डोकाडिया यांच्या घरात त्या रात्री नेमकं काय घडलं होतं, याविषयी नातेवाईकांनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला आहे.

नेमकं काय घडलं?

‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना अब्दुल्ला यांच्या आई म्हणाल्या, “माझ्या मुलाचं अख्खं कुटुंबच संपलं. माझा अजूनही यावर विश्वास बसत नाहीये. गेल्या आठवड्यातच आमची भेट झाली होती आणि मी नातींसोबत चांगला वेळ घालवला होता. त्याची मोठी मुलगी दहावीत होती आणि छोटी आठवीत. यापलीकडे मी काही बोलण्याच्या मनस्थितीत नाही.” या घटनेविषयी बोलताना त्यांना रडू कोसळलं. अब्दुल्ला यांच्या एका नातेवाईकाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी 25 एप्रिल रोजी ते चौघे जण बाहेर जेवायला गेले होते. रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांनी बिर्याणी खाल्ली होती. त्यानंतर पावणे बाराच्या सुमारास ते घरी परतले. घरी परतल्यानंतर मुलांना भूक लागल्यामुळे रात्री एक-दीडच्या सुमारास अब्दुल्ला आणि नसरीन यांनी कलिंगड कापून खाल्लं. कलिंगड खाल्ल्यानंतर काही तासांतच पहाटेच्या सुमारास चौघांनाही उलट्या आणि जुलाबचा त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

कलिंगड विक्रेत्याची चौकशी

अब्दुल्ला यांचा चुलत भाऊ मोहम्मद मुस्तफा इक्बाल यांनी सांगितलं की, सर्व पाहुण्यांनी चिकन बिर्याणी खाल्ली होती. परंतु याच कुटुंबाने कलिंगड खाल्ला होता. त्यामुळे कलिंगडमधूनच विषबाधा झाल्याचा आम्हाला संशय आहे. पोलिसांकडून आता सर्व बाजूंनी चौकशी सुरू आहे. या प्रकरणात अद्याप संशयास्पद काही सापडलं नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. कलिंगड विक्रेत्याच्या चौकशीतदेखील अद्याप काही संशयास्पद सापडलं नसल्याची पोलिसांची माहिती आहे. पायधुनीच्या घाटी गल्लीत जिथे ही दुर्दैवी घटना घडली, तिथे अद्याप कलिंगड खाऊन विषबाधा झाल्याचा इतर कोणताही प्रकार समोर आला नाही. याप्रकरणी पोलिसांनी व्हिसेरा रासायनिक तपासणीसाठी पाठवला असून त्याच्या अहवालात सगळं स्पष्ट होईल, असं सांगण्यात येतंय.

डोकाडिया कुटुंबीयांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे शेजाऱ्यांनी त्याच इमारतीत चौथ्या मजल्यावर राहत असलेल्या डॉ. कुरेश यांना बोलावलं. त्यांनी प्राथमिक उपचार करण्याचा प्रयत्न केला, परंतु परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं पाहून चौघांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

सांगोला : कोळे परिसर हादरला; पेट्रोलच्या वादातून वृद्धाची हत्या, पोलिसांनी ५ तासांत आरोपीला पकडले

महाबळेश्वरच्या घाटात 900 फूट दरीत दाम्पत्य कोसळल; पत्नी-पत्नीचा दुर्दैवी अंत, दुसऱ्यादिवशीही चालली शोध मोहिम

Pune Bus Accident CCTV : अचानक ब्रेक फेल, भरधाव बस लग्नपत्रिकेच्या दुकानात शिरली; पुण्यात भीषण अपघात

Kolhapur Crime: कोल्हापुरात भिंत अंगावर कोसळून एका प्राध्यापिकेसह शाळकरी विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू; जुनं घर जेसीबीच्या साहाय्याने पाडत असताना काळाचा घाला

Latur Crime News: चुलतीने 6 वर्षांच्या पुतण्याला संपवलं; पडक्या घराजवळ मृतदेह आढळला, लातूरमधील हादरवणारी घटना

Video : वर्षभरानंतर पुन्हा हादरलं जम्मू काश्मीर; भीषण रस्ते अपघातात प्रवासी बस उलटली, मृतांचा आकडा वाढण्याची भीती