टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Pune Bus Accident CCTV : अचानक ब्रेक फेल, भरधाव बस लग्नपत्रिकेच्या दुकानात शिरली; पुण्यात भीषण अपघात

On: April 22, 2026 10:58 AM
Follow Us:

Pune Appa Balwant Chowk PMPML Accident CCTV : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) ‘पुण्यदशम्’ बसचा ब्रेक निकामी झाल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून ती थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दुकानात शिरली. शहरातील अत्यंत गजबजलेल्या आणि मध्यवर्ती ठिकाण असलेल्या अप्पा बळवंत चौकात मंगळवारी दुपारी ही घटना घडली. या धडकेत दुकानाचे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

पुणे : पुण्याच्या गजबजलेल्या मध्यवर्ती भागातील आप्पा बळवंत चौक येथे काल मंगळवारी दुपारी PMPML बसचा भीषण अपघात झाला. भरधाव वेगात आलेली बस थेट लग्नपत्रिकेच्या छपाई दुकानात घुसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, बसचा अचानक ब्रेक फेल झाल्यानं चालकाचं नियंत्रण सुटलं आणि बस रस्त्यालगत उभ्या असलेल्या दुचाकींना धडक देत दुकानात घुसली. या अपघातात दुकानाच्या काचा, फर्निचर आणि साहित्याचे मोठं नुकसान झालं आहे. तसेच काही दुचाकींचंही नुकसान झालं आहे.

अपघाताचं CCTV फुटेजही समोर
घटनेवेळी दुकानात मालक किंवा ग्राहक नसल्यानं आणि फुटपाथवरही वर्दळ कमी असल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र, हा अपघात अत्यंत भीषण होता, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. दरम्यान, घटनेचे CCTV फुटेजही समोर आले असून त्यामध्ये बस थेट दुकानात घुसताना दिसत आहे. अपघातानंतर विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

दुकानमालकाने या अपघातात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा केला असून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. PMPML प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असून, नेमकं कारण आणि जबाबदारी निश्चित केली जात आहे. दरम्यान, आप्पा बळवंत चौक हा वर्दळीचा भाग आहे. हजारोच्या संख्येने नागरिक त्याठिकाणी ये जा करत असतात. शहरातील मुख्य भागात अशी घटना घडणं हे अतिशय धोक्याचं मानलं जातं. या घटनेचा सखोल तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. तपासात काय बाबी समोर येतात याकडे पुणेकरांचं लक्ष लागलं आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now