Latur Crime News: लातूरमध्ये सहा वर्षीय देवांश मंगेश स्वामी याचा खून कुटुंबातीलच चुलतीने केल्याचे उघड झाले असून पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे.

Latur Crime News: लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे घडलेल्या धक्कादायक घटनेत सहा वर्षीय देवांश मंगेश स्वामी याचा खून कुटुंबातीलच चुलतीने केल्याचे उघड झाले असून पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latur Crime News)
स्वामी कुटुंबात मागील काही वर्षांपासून मालमत्तेच्या वाटणीवरून वाद सुरू होता. हा वाद पंचांच्या उपस्थितीत मिटवण्याचे प्रयत्नही झाले होते. मात्र, या वादातून निर्माण झालेल्या रागाच्या भरात अनिता दिनेश स्वामी (वय 34) हिने आपल्या पुतण्याचा खून केल्याचा समोर आले आहे. चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 196/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103(1) आणि 238 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी मंगेश चंद्रकांत स्वामी यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. (Latur Crime News)
नेमकं काय घडलं? (Latur Crime News)
19 एप्रिल रोजी उजळंब रोडवरील एका पडक्या घराजवळ देवांशचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता, आरोपीने गळा दाबून खून केल्याचे समोर आले. खून केल्यानंतर मृतदेह लपवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणात आरोपीने स्वतःचा मुलगा बेपत्ता असल्याचा बनावही रचला होता. मात्र पोलिसांनी शोधमोहीम राबवत त्या मुलाला सुखरूप शोधून काढले आणि याच धाग्यावरून संपूर्ण गुन्ह्याचा उलगडा झाला.
17 तासांत गुन्ह्याचा उलगडा, आरोपी अटकेत- (Latur Crime News)
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी सुधाकर बावकर यांनी चाकूर येथे ठाण मांडून तपास केला. पोलीस अधीक्षकांनी स्वतः तपासाची सूत्रे हाती घेतली होती. अवघ्या 17 तासांत पोलिसांनी या गुन्ह्याचा उलगडा करत आरोपीला अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक भंडे करत असून, या घटनेमुळे नात्यातील व्यक्तीकडूनच असा प्रकार घडल्याने संतप्त चर्चा होत आहे.
















