विमा खरेदी, एलपीजी खरेदी करणे, वीज सबसिडी यांसह अनेक नियम येत्या १ नोव्हेंबरपासून बदलणार आहेत. याशिवाय खात्यातील पीएम किसान योजनेची रक्कम तपासण्यासाठी नियमही बदलण्यात आले आहेत. विमा नियामक इर्डाने नॉन-लाइफ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करण्यासाठी केवायसी अनिवार्य केले आहे.
आतापर्यंत केवळ जीवन विम्यासाठी आणि आरोग्य आणि वाहन विमा यांसारख्या नॉन-लाइफ इन्शुरन्ससाठी, एक लाख रुपयांपेक्षा जास्त दावे असल्यास ते अनिवार्य होते. मात्र १ नोव्हेंबरपासून ते सर्वांसाठी अनिवार्य होणार आहे.
सिलेंडर बुक केल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर ओटीपी येईल. तुम्हाला गॅस डिलिव्हरीच्या वेळी ओटीपी सांगावा लागेल, तरच तुम्हाला तो मिळेल. कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये यासाठी सरकारने हे केले आहे. याशिवाय, प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल होण्याची शक्यता आहे, कारण प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला त्यांचा आढावा घेतला जातो.
अशा स्थितीत १ नोव्हेंबरला किमतीत बदल पाहायला मिळू शकतो. पीएम किसान योजनेच्या १२ व्या हप्त्यासाठी पैसे पाठवण्यापूर्वी मोठा बदल करण्यात आला आहे.
आता लाभार्थी शेतकरी पोर्टलवर जाऊन आधार क्रमांकावरून त्यांची स्थिती तपासू शकणार नाहीत आणि त्यासाठी त्यांना आता नोंदणीकृत मोबाईल क्रमांक द्यावा लागणार आहे. यापूर्वी पंतप्रधान किसान योजनेत मोबाइल किंवा आधार क्रमांकावरून स्थिती जाणून घेता येत होती.