सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धेश्वर महाराज मंदिर परिसरातील संमती कट्ट्याजवळ ९०० वर्षांची परंपरा असलेला नंदीध्वजांचा अनुपम अक्षता सोहळा आज दुपारी लक्षावधी भाविकांनी अनुभवला. ओम सिद्धरामा नम:… दिड्ड्यम् दिड्ड्यम्… सत्यम् सत्यम्… नित्यम् नित्यम् या मंत्रोच्चारासह मंगलाष्टक सुरू झाले अन् लाखो भाविकांनी सिद्धेश्वरांच्या नंदीध्वजांवर तांदळाच्या अक्षतांचा वर्षाव केला.
अपूर्व उत्साह आणि शिस्तीचे दर्शन घडवणाऱ्या या सोहळ्यास दुपारी २.०५ वाजता सुरुवात झाली. एकदा भक्तलिंग बोला… हर्र… बोला हर्र..चा गजर आणि सिद्धेश्वर महाराज की जय असा जयघोष होत होता. कोरोना महामारी मुळे सलग दोन वर्षे भक्तांच्या अनुपस्थितीत झालेल्या अक्षता सोहळ्याला यंदा लाखों भक्तांची मांदियाळी होती.
शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या योगदंडाचे प्रतीक असलेल्या सातही मानाच्या काठ्या (नंदीध्वज) संमती कट्ट्याजवळ दुपारी सव्वा एक वाजता दाखल झाल्या. पंचाचार्यांचा समता ध्वज, पालखी होती. नाशिक ढोल या मिरवणुकीत होता.
सात काठ्या विविधरंगी फुलांनी सजवल्या होत्या. मानाच्या पहिल्या काठीला सुंदर बाशिंग बांधलेले होते. सवाद्य मिरवणुकीत मोठ्या उत्साहात मंदिर परिसरातील संमती कट्ट्यालगत सात काठ्या आल्या. पांढरे बाराबंदी, धोतर, डोईवर पांढरा फेटा, कपाळाला गंध अशा पेहरावात लाखाे भाविकांमुळे सोहळ्यात उत्साह, भक्ती आणि शिस्तीचे दर्शन घडले.