दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय नोटांवर लक्ष्मी आणि गणेशाचा फोटो लावण्याची मागणी केली. यामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यातील राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. यानंतर देशातील विविध भागातून नोटांवरील फोटोंबाबत वेगवेगळ्या मागण्या सुरु झाल्या आहेत.
यात आता भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणे यांनी नोटांवर मराठी साम्राज्याचे प्रतिक छत्रपती शिवरायांचा फोटो लावण्याची मागणी केली आहे. यासोबत त्यांनी दोनशे रुपयांच्या नोटेचा फोटोशॉप केलेला फोटोही पोस्ट केला आहे.
राणे यांनी फोटो ट्विट करत म्हटले की, हे परफेक्ट आहे. गुजरात निवडणुकीपूर्वी दिल्लाचे आमदार अरविंद केजरीवाल हे यातून हिंदु कार्ड खेळत असल्याचा आरोप केला जात आहे. नोटांवर लक्ष्मी आणि भगवान गणेशाच्या फोटो छापावा, अशी मागणी केजरीवालांनी केली होती.
यातून अर्थव्यवस्थेला अधिक बळकटी येत डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन थांबण्यासही मदत होऊ शकते, असा दावा त्यांनी केला. केजरीवाल्यांच्या या मागणीनंतर भाजपतील अनेक वरिष्ठ नेत्यांनी हल्लाबोल केला आहे.
भाजपने म्हटले की, केजरीवाल आपल्या सरकारच्या त्रुटी आणि आम आदमी पक्षाच्या हिंदुविरोधी मानसिकतेपासून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी राजकीय खेळी करत आहेत. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटले की, केजरीवाल यांनी जे काही सांगितले ते त्यांच्या यू-टर्न राजकारणाचा आणखी एक विस्तार आहे. यातून त्यांचा ढोंगीपणा दिसून येत आहे.