सांगोला (प्रतिनिधी):-गेल्या एक-दोन महिन्यापासून बंद असलेली सांगोला तालुक्यातील अवैध वाळू वाहतुकीने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यातून शासनाचा हजारो रुपयांचा महसूल बुडत आहे. या प्रकाराकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे. काही महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा वाळू उपसा सुरु झाल्याने लोकप्रतिनिधींच्या धोरणाला संबंधीत विभागांकडून सुरुंग लावण्यात येत असल्याचे चित्र सांगोला तालुक्यात सध्या सुरु आहे. तालुका प्रशासनाकडून केवळ थातूरमातूर कारवाई करण्यात येते. मात्र, कारवाईनंतर पुन्हा जोशाने वाळू उपसा केला जात असल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
विधानसभा निवडणुकीत अवैध वाळू उपसा हा विषय मोठा चर्चिला गेला.निवडणूक झाल्यानंतर आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी अवैध वाळू उपसा बंद करण्याची घोषणा केली. त्याची अंमलबजावणीही काही अंशी झाली होती. तसेच विधानसभा निवडणुकीनंतर वाळू उपसा बंद असल्याच्या मोठ्या चर्चा तालुक्यात सुरु होत्या. परंतू गेल्या काही दिवसापासून पालकमंत्री व लोकप्रतिनिधींच्या आदेशाची केराची टोपली दाखवत खारवटवाडी, जांगळेवस्ती, कडलास, अकोला या दोन्ही गावातील हद्दीवर, जवळा, वाटंबरे, वासूद, कोळा या गावात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरु असून सध्या मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपशाचा हायवा, ट्रक, ट्रॅक्टर आदी वाहने बिनधास्तपणे दिवसरात्र धावत असल्याचे नागरिक सांगत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून वाळू तस्करीला चांगलेच उधाण आले आहे. कोणालाही न जुमानता खारवटवाडी, जांगळेवस्ती, कडलास अकोला या दोन्ही गावातील हद्दीवर, जवळा, वाटंबरे, वासूद, कोळा गावात वाहनांच्या माध्यमातून वाळू माफियांकडून दिवसाकाठी शेकडो ब्रास वाळूची तस्करी करण्यात येत आहे. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असताना संबंधीत यंत्रणा मात्र गप्प आहेत. विशेष म्हणजे, वाळू वाहतूक करणार्या ट्रॅक्टरांचे नंबर प्लेट काढून टाकण्यात आलेले आहेत. अवैध वाळू तस्करांना कोणाचीच भीती राहिलेली नाही.
तालुक्यातील जागरूक नागरिकांनी कित्येक वेळा भरलेली वाहने अडवली मात्र मुजोर वाळू माफिया व त्यांना साथ देणारे महसूल विभागाचे सर्कल,तलाठी यांच्यामुळे स्थानिक नागरिक हतबल झाले आहेत.आपुन दोघे भाऊ वाटून वाटून खाऊ या प्रमाणे अवैध वाळू उपसा सुरू आहे.वाळूच्या अवजड वाहनांमुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील नदी काठच्या गावांच्या रस्त्यांची चाळण झाली आहे.मागील काही महिन्यांत वाळूमाफियांना चाप बसला असताना गेल्या काही आठवड्यापासून मात्र याउलट परिस्थिती आहे. मागील काही दिवसात वाळूमाफियांना तेथे अक्षरश: हैदोस घातला आहे. प्रशासनाच्या नाकावर टिच्चून दिवसाढवळ्या या काळ्या सोन्याची लूट केली जात आहे. झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी वाळूचा अवैध उपसा करून पर्यावरणाचाही र्हास घडविणार्या या मंडळींविरोधी पोलिस-प्रशासनाने विशेष मोहीम उघडायला हवी.
भरधाव धावणार्या ट्रॅक्टरांना कोणी हटकल्यास मुजोरीची भाषा वापरतात. पोलिसात तक्रार देण्याची धमकी दिली तर आम्ही हप्ते देतो. त्यामुळे आमचे कोणी काही बिघडवू शकत नाही, अशी भाषा वापरत असल्याचे संबंधीत परिसरातील शेतकर्यांमधून सांगण्यात येत आहे.
तालुक्याला पुर्वीसारखे शिस्त लावणारे कर्तव्यदक्ष अधिकारी, पोलीस निरीक्षक अशा खमक्या अधिकार्यांची गरज असल्याचा त्याचा शिस्तबद्ध कायदेशीर कार्यकाळ अनुभवलेले संवेदनशील नागरिक बोलून दाखवत आहेत.
तालुक्यातील संबंधीत असणार्या विभागाकडून अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणार्यांवर ठोसपणे कारवाई होताना दिसून येत नाही. याला कारणीभूत प्रशासनातील काही झारीतील शुक्राचार्य व भ्रष्ट अधिकारी सुद्धा असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत असून खासदार धैर्यशील मोहिते-पाटील व आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी अवैध वाळू व्यवसायांबाबत लोकसभेत व विधानसभेत आवाज उठवावा, अशी मागणी सर्वसामान्यांमधून जोर धरु लागली आहे.
सांगोला शहरानजीक असणार्या खारवटवाडी येथे दिवस- रात्र जेसीबीच्या सहाय्याने वाळू उपसा सुरू असल्याचे परिसरातील नागरीकांकडून सांगण्यात येत असून प्रशासन मात्र मुग गिळून गप्प का आहे ? असा सवालही नागरीक उपस्थित करीत आहेत.