लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं, महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार मुसंडी मारली. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं, तब्बल 232 उमेदवार विजयी झाले. मात्र दुसरीकडे या निवडणुकीत महाविकास आघाडीला मात्र मोठा धक्का बसला. या निवडणुकीनंतर आता महाविकास आघाडीतील अनेक नेते महायुतीमध्ये विशेष: भाजप आणि शिवसेनेत येताना दिसत आहेत. याचा सर्वात मोठा फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाला गळती लागली असून, आतापर्यंत राज्यातील अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे, सध्या शिवसेनेच्या ‘ऑपरेश टायगर’ची जोरदार चर्चा सुरू आहे, यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले शरद पवार?
याबाबत मला माहिती नाही, पण माझ्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष या सर्व खासदारांची बैठक होती. आम्ही दोन तीन तास चर्चा केली. त्यात कुणाच्याही मनात फुटण्याचा विचार नाही. उद्धव ठाकरेंचे लोक त्यांच्यासोबत एका विचाराने आहेत, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान ‘हलके में मत लो’ असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना इशारा दिला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी एकनाथ शिंदे यांना जोरदार टोला लगावला आहे. ‘हलके में मत लेलो हे काय प्रकरण आहे. मला मराठी जेवढं कळतंय त्यात हा शब्द नाही’ असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान दिल्लीमध्ये आयोजित साहित्य संमेलनामध्ये बोलताना शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना ठाकरे गटावर गंभीर आरोप केला. एका पदासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज द्यावा लागतात असं त्यांनी म्हटलं होतं. याला देखील शरद पवार यांनी प्रत्युत्त दिलं आहे. संजय राऊत यांनी जे सांगितलं ते १०० टक्के बरोबर आहे. प्रश्न असा आहे की, नीलम गोऱ्हे यांनी भाष्य करण्याची गरज नव्हती हे माझं मत होतं. हे अधिवेशन चांगलं चाललं होतं. सर्वांचा सहभाग होता. त्यात नाही त्या गोष्टी काढायला नको होत्या, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.