नगराध्यक्ष पदासाठी मारुतीआबा बनकर यांच्या नावावर कार्यकर्त्यांकडून शिक्कामोर्तब; शेकापचा स्वबळाचा नारा !

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

सांगोला : आगामी सांगोला नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाच्या (शेकाप) कार्यकर्त्यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीत पक्षाने कोणत्याही युतीशिवाय स्वबळावर निवडणूक लढवण्याचा नारा दिला असून, कार्यकर्त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी शेकापचे ज्येष्ठ नेते मारुतीआबा बनकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. परंतु तुमच्या सर्वांच्या मतांचा आदर मी ठेवणार असून माझ्या मनात सुध्दा मारूतीआबांचे नाव आहे. परंतु मारूतीआबांना त्यांच्या कुटूंबियांशी चर्चा करण्यासाठी वेळ देऊयात आणि ज्येष्ठ मंडळींशी चर्चा करून आपण अंतिम निर्णय घेऊया, असे मत आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केले.

सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात सांगोला शहरातील शेकाप कार्यकर्ते व हितचिंतकांची बैठक काल शुक्रवारी सायंकाळी सांगोला शहरातील पक्ष कार्यालयात आयोजीत करण्यात आली होती. यावेळी आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख बोलत होते. यावेळी सांगोला शहरातील 11 प्रभागातील अनेक कार्यकर्त्यांनी व हितचिंतकांनी नगराध्यक्ष पदासाठी मारूतीआबा बनकर यांचे नाव सूचवून निवडून आणण्यासाठी आम्ही जीवाचे रान करू, असा विश्वासही अनेकांनी बोलून दाखविला.
स्व.भाई गणपतराव देशमुख यांच्यासोबत अनेक वर्षे काम करणारे प्रामाणिक सहकारी म्हणून मारूतीआबा बनकर हे तालुक्यात परिचीत आहेत. सांगोला तालुक्याच्या राजकारणात मारुतीआबा बनकर यांचे मोठे योगदान आहे. जनसंपर्कामुळे त्यांचा प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नागरीकांमध्ये मोठा प्रभाव आहे. स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय झाल्यानंतर, सर्व कार्यकर्त्यांनी एकमताने मारुतीआबा बनकर यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.
गेल्या काही दिवसांपासून शेकापच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढवावी, असा मतप्रवाह होता. शहर पातळीवर पक्षाची मजबूत बांधणी आणि कार्यकर्त्यांची मोठी फळी असल्याने, कोणाशीही हातमिळवणी न करता निवडणुकीला सामोरे गेल्यास निश्चितपणे यश मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

सांगोला नगरपालिका निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाने (शेकाप) स्वबळावर लढण्याचा जो महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, त्याला आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. शेकाप कार्यकर्त्यांनी नगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचा जो नारा दिला आहे, त्याबद्दल बोलताना आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी हा निर्णय मला एकट्याला घेता येणार नसून पक्षातील सर्वांना विश्वासात घेऊन आपण पुढील रणनिती आखूया, असे सांगत कार्यकर्त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा जो नारा दिला आहे, तो कार्यकर्त्यांचा आवाज आहे. त्यामुळे आपला स्वबळावरच नारा कायम ठेऊन नगरपालिकेवर आबासाहेबांचा लाल बावटा फडकाविण्यासाठी आजपासून कामाला लागूया, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

नगरपालिकेच्या निवडणुकीची रणनिती निश्चित करण्यासाठी प्रत्येक प्रभागात लवकरच एक शिष्टमंडळ स्थापन करणार आहे. या शिष्टमंडळाकडे शहरातील इच्छुकांनी दोन दिवसात आपापली नावे द्यावीत, त्यानंतर उमेदवारांची निवड आणि प्रचाराची दिशा यावर सखोल चर्चा करून अंतिम निर्णय घेणार असल्याचे डॉ.देशमुख यांनी स्पष्ट केले.

शेकाप कार्यकर्त्यांनी घेतलेल्या या स्वबळाच्या भूमिकेमुळे सांगोला नगरपालिकेचे राजकारण पूर्णपणे बदलणार आहे. या निर्णयाचा परिणाम इतर पक्षांच्या संभाव्य युती आणि आघाड्यांवर निश्चितपणे होईल. शेकाप जर स्वबळावर उतरला तर, निवडणुकीत चुरस वाढणार असून, मतदारांना एक सक्षम पर्याय उपलब्ध झाला असून त्यामुळे आता इतर राजकीय पक्ष काय भूमिका घेतात, याकडे सांगोलाकरांचे लक्ष लागले आहे.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon