Parbhani Hingoli Vidhan Parishad : परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून डॉ. विवेक नावंदर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

परभणी : विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघांच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या 17 जागांमध्ये परभणी हिंगोली मतदारसंघाची निवडणूक देखील जाहीर झाली आहे. एकीकडे महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चा सुरु असतानाच महाविकास आघाडीनं मात्र ही निवडणूक लढवायची भूमिका घेत प्रत्येक ठिकाणी उमेदवार देण्याचं निश्चित केलं आहे. त्यानुसार महाविकास आघाडीत ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाट्याला 17 पैकी 6 जागा आल्या आहेत. यामध्ये परभणी हिंगोली मतदारसंघाचा देखील समावेश आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे विधानपरिषदेचे आमदार आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी परभणी हिंगोली मतादारसंघासाठी डॉ. विवेक नावंदर यांच्या नावाची घोषणा केली आहे.
परभणी हिंगोलीचा उमेदवार ठाकरेंच्या सेनेकडून जाहीर
महाविकास आघाडीकडून परभणी हिंगोली स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून डॉ. विवेक नावंदर यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. आमदार अंबादास दानवे यांनी ट्विट करून नावंदर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. डॉ. विवेक नावंदर ठाकरेंच्या शिवसेनेचे परभणीचे महानगरप्रमुख आहेत. अंबादास दानवे यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलं की, हिंदुहदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे परभणी महानगरप्रमुख डॉ. विवेक नावंदर यांची परभणी – हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक – 2026 साठी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून घोषणा करण्यात येत आहे.

डॉ. विवेक नावंदर यांच्या उमेदवारीनं रंगत वाढली
डॉ. विवेक नावंदर हे परभणी शहरातील उबाठा शिवसेनेचे शहरप्रमुख असून पक्ष संघटनेत सक्रिय भूमिका बजावत आहेत.त्यांच्या उमेदवारीमुळे परभणी-हिंगोली मतदारसंघातील निवडणूक राजकीयदृष्ट्या अधिक रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.महाविकास आघाडीने या निवडणुकीत डॉ. नावंदर यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी दिल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आघाडीच्या पदाधिकारी व सदस्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नावंदर यांच्या नावाच्या घोषणेनंतर महायुतीकडून अधिकृत उमेदवार कोण असणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
















