US Iran War : अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध पुन्हा भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीवरुन इराण आक्रमक झाला आहे.
नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेतून काही मार्ग निघत नसल्याचं चित्र आहे. अमेरिकेनं इराणनं आमच्यासोबत डील करावी अशी भूमिका घेतली आहे. इराण जर डील करणार नसेल त्यांच्यावर लष्करी कारवाईचा पर्याय खुला असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं. आता इराण देखील होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या मुद्यावरुन आक्रमक झाला आहे. इराणनं आता होर्मुझच्या सामुद्रधुनीवर आरपारची भूमिका घेतल्याचं बोललं जातंय. इराणची वृत्तसंस्था फार्सनुसार इराणच्या नौसेनेनं होर्मुझजवळ एका अमेरिकन युद्धनौकेवर दोन क्षेपणास्त्रांचा मारा करत हल्ला केला आहे.
इराणच्या या भूमिकेमुळं आखाती देशांमध्ये युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे. इराणच्या दाव्यानुसार इशारे दिल्यानंतर देखील त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या युद्धनौकेवर क्षेपणास्त्राद्वारे मारा करण्यात आला आहे.
इराणच्या मीडियानुसार हा हल्ला सामरिक दृष्टया महत्त्वाच्या अशा जास्क बेटाजवळ झाला आहे. इराणच्या नौदलाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्यानं अमेरिकेच्या युद्धनौकेवर दोन क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला. क्षेपणास्त्रांचा हल्ला झाल्यानं अमेरिकेच जहाज पुढं जाण्याच्या स्थितीत राहिलं नाही, त्यामुळं त्यांना माघार घ्यावी लागली, असा दावा इराणकडून करण्यात आला आहे. स्थानीक सूत्रांनुसार दुसऱ्या अमेरिकन युद्धनौकेला इराणच्या इशाऱ्यानंतर मार्ग बदलावा लागला.

अमेरिका – इराण तणाव कशामुळं?
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीत प्रोजेक्ट फ्रीडमची घोषणा केली आहे. ट्रम्प यांच्या या ऑपरेशनचा मुख्य हेतू होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेल्या जहाजांना मदत करणं हे आहे. अमेरिकन सेंट्रल कमाडनुसार या मिशनमध्ये 15000 सैनिक, 100 अधिक लष्करी विमानं, युद्धनौका आणि अत्याधुनिक ड्रोनचा समावेश आहे.
इराणनं देखील यापूर्वी जाहीर केल्यानुसार विदेशी सैन्य हालचालींसाठी त्या देशांना इराणसोबत ताळमेळ साधावा लागेल. इराणकडून अमेरिकेच्या युद्धनौकेवर क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आल्यानंतर ट्रम्प काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. इराणच्या हल्ल्यावर अमेरिका किंवा त्यांच्या नौदलाकडून अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. संरक्षण क्षेत्रातील जाणकारांच्या मते इराणचा दावा खरा असेल तर तेल पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी हे मोठं संकट ठरु शकतं.
अमेरिका आणि इस्त्रायल यांच्याकडून इराणवर 28 फेब्रुवारीला हल्ले करण्यास सुरुवात झाली होती. इराणनं त्यांचा अणवस्त्र कार्यक्रम थांबवावा, संवर्धित यूरेनियम अमेरिकेच्या ताब्यात द्यावं, या मागण्यांसाठी अमेरिकेनं इराणवर हल्ले केले. इराणनं देखील सौदी अरेबिया आणि आखातातील विविध देशातील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले केले. या युद्धात अमेरिकेचं देखील मोठं आर्थिक नुकसान झालंय.













