राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लवकरच एक स्फोटक मुलाखत प्रसिद्ध होणार आहे. या मुलाखतीचा प्रोमो जारी करण्यात आला आहे.
Uddhav Thackeray Interview : राज्यात गेल्या काही दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. हीच बाब लक्षात घेता राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. दुसरीकडे मुंबई पालिका जिंकण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही भावांचे पक्ष एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. असे असतानाच आता उद्धव ठाकरे यांच्या स्फोटक मुलाखतीची चर्चा होत आहे. शिवसेनेच्या (ठाकरे गट) सामना या मुखपत्राद्वारे ही मुलाखत घेण्यात आली असून या मुलाखतीचा प्रोमो प्रसिद्ध झाला आहे. या प्रोमोनुसार उद्धव ठाकरे यावेळी मोठे गौप्यस्फोट करणार असल्याचे बोलले जात आहे.
दोन भागांत प्रसिद्ध होणार मुलाखत
सामनाचे संपादक तथा खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. याच मुलाखतीचा प्रोमो राऊत यांनी त्यांच्या एक्स खात्यावर शेअर केला आहे. 19 आणि 20 जुलै रोजी दोन भागांत ही मुलाखत प्रसिद्ध होणार आहे. या मुलाखतीत संजय राऊतांनी ठाकरेंना अनेक रोखठोक प्रश्न विचारले आहेत. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंनीदेखील या प्रश्नांची सडेतोड उत्तरं दिली आहेत. याच मुलाखतीत त्यांनी राज ठाकरे यांच्यावरही भाष्य केल्याचं दिसतंय. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यावेळी नेमके काय गौप्यस्फोट करणार? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
मुलाखतीच्या प्रोमोमध्ये नेमकं काय आहे?
समोर आलेल्या प्रोमोमध्ये संजय राऊत उद्धव ठाकरेंना काही प्रश्न विचारताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीत तुमचा विजय झाला पण विधानसभा निवडणुकीत मात्र निराशाजनक कामगिरी झाली. यामागचं कारण काय? असा प्रश्न राऊतांनी ठाकरेंना विचारला आहे. तसेच ठाकरे म्हणजे सदासर्वदा एक संघर्ष आहे. हा संघर्ष मतलबी वाऱ्यासाठी नाही. तर आम्ही समाजासाठीच सगळं करत आहोत. माझ्या आजोबांपासून हे सगळं चालू आहे. बाळासाहेब ठाकरे होते. हा संघर्ष करण्यासाठी आदित्य ठाकरे आहे. मी आहे. आता राज ठाकरेदेखील सोबत आले आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणताना दिसत आहेत.
दरम्यान, आता ठाकरे यांनी दिलेल्या प्रश्नांची उत्तरं पाहता ते आगामी मुंबई महापालिका निवडणूक, ही निवडणूक जिंकण्यासाठीची तयारी याविषयी ते नेमकं काय सांगणार? तसेच ते राज ठाकरे यांच्यासोबतच्या युतीवरही नेमकी काय भूमिका जाहीर करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.