MNS Shiv Sena Alliance : युतीची चर्चा ही कॅमेरासमोर होत नाही, त्यासाठी योग्य तो प्रस्ताव यावा लागतो असं मनसेच्या नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यावर उद्धव ठाकरेंनी वक्तव्य केलं.
मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होणार, आता संकेत देणार नाही, थोड्या दिवसात बातमीच देतो असं थेट वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं. आपल्या शिवसैनिकांच्या मनात कोणताही संभ्रम नाही, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनातही कोणताच संभ्रम नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले. त्यामुळे मनसे आणि शिवसेना ठाकरेंच्या युतीवर दोन्ही नेते सकारात्मक असल्याचे संकेत मिळत आहेत.
मातोश्रीवर चारकोपमध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेच्या पदाधिकाही सुजाता शिंगाडे यांचा पक्षप्रवेश पार पडला. या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांना राज ठाकरे-उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार यासंदर्भात विचारणा करण्यात आली. तसंच मनसेने तुम्ही आधी युतीचा प्रस्ताव पाठवावा अशी मागणी केल्याचं विचारलं असता ते म्हणाले, “जे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आहे ते होईल”. इतर बारकावे आम्ही पाहतो असं सांगत त्यांनी यापेक्षा जास्त भाष्य करण्यास नकार दिला.
“मी संदेश नाही, बातमीच देईन. माझ्या शिवसैनिकांच्या मनात संभ्रम नाही. त्यांचेही मनसैनिक आमच्या संपर्कात आहे. त्यांच्याही मनातही संभ्रम नाही. त्यामुळे संदेश देण्यापेक्षा बातमीच देईन,” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिवसेना ठाकरे आणि मनसेच्या युतीची चर्चा सुरू आहे. परंतु अद्याप तसा कोणताही प्रस्ताव आपल्याकडे आला नाही, युतीची चर्चा ही कॅमेरासमोर होत नाही असं मनसेच्या नेत्यांनी स्पष्ट केलं होतं. तसेच या आधी 2014 आणि 2017 साली अशीच चर्चा झाली होती, त्यामुळे आता ताकही फुंकून प्यावं लागत असल्याचं मनसेनेच्या नेत्यांनी म्हटलं होतं.
मनसेच्या या प्रतिक्रियावर उद्धव ठाकेरेंनी वक्तव्य केलं. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे काही आहे ते होणारच असे उद्धव ठाकरे म्हणाले. युतीच्या चर्चांवर आता कोणतेही संकेत देणार नाही, थेट बातमीच देतो असंही ते म्हणाले. युतीसंबंधी जे बारकावे असतील त्यावर आम्ही काय करायचे ते पाहू असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. उद्धव ठाकरेंचे हे वक्तव्य म्हणजे शिवसेना-मनसे युतीकडे पडलेलं पुढचं पाऊल असल्याची चर्चा आहे.
MNS On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या बातमीची वाट पाहू
मनसेचे नेते अविनाश देशपांडे म्हणाले की, “ज्यावेळी आमच्याकडे युतीचा ठोस प्रस्ताव येईल त्यावेळी त्यावर राज ठाकरे निर्णय घेतील. उद्धव ठाकरे म्हणाले की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे काही आहे ते होईल. परंतु महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात 2014 आणि 2017 सालीही काहीतरी होतं. पण उद्धव ठाकरेंच्या मनात नव्हतं. त्यामुळे जनतेच्या मनात काहीही असो, उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे ते महत्त्वाचं.”
उद्धव ठाकरे म्हणाले की ते बातमी देणार. त्यामुळे ते काय बातमी देणार याची वाट पाहू असं संदीप देशपांडे म्हणाले.
उद्धव ठाकरेंना त्यांचे सहकारी फसवतात. वैभव दवळीला त्यांनी प्रवेश दिला.पण तो मनसेचा पदाधिकारी नव्हता. 2014 सालीच त्याची आम्ही हकालपट्टी केली होती. तो आमचा कार्यकर्ता नाही असं संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलं.