टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

कोणी हळदीसाठी जात होतं, तर कोणी लग्नावरुन परतत होतं पण नियतीने…; महाराष्ट्रात रस्ते अपघातांचे भीषण सत्र सुरू

महाराष्ट्रात रस्ते अपघातांचे भीषण सत्र सुरू असून सातारा, बीड, बुलढाणा आणि संभाजीनगरमध्ये झालेल्या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. लग्नाचे कार्य आणि कौटुंबिक आनंदाच्या प्रसंगी झालेल्या या अपघातांनी राज्याला हादरवून सोडले आहे. या सर्व घटनांचा सविस्तर आढावा येथे वाचा.

कोणी हळदीसाठी जात होतं, तर कोणी लग्नावरुन परतत होतं पण नियतीने...; महाराष्ट्रात 24 तासात काय घडलं?

राज्यातील रस्ते अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासांत राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये ५ मोठे अपघात झाले आहेत. या मोठ्या अपघातांमध्ये एकूण ११ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. विशेषतः लग्नसराईचे दिवस असल्याने आनंदाचे वातावरण असलेल्या अनेक कुटुंबांवर या अपघातांमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये हळदीला जाताना तरुणीचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षात शिकणारी तेजल प्रधान ही विद्यार्थिनी आपल्या वडिलांसोबत दुचाकीवरून हळदीच्या कार्यक्रमासाठी जात होती. वाटेत एका भरधाव कंटेनरने त्यांच्या दुचाकीला भीषण धडक दिली. या अपघातात तेजलचा जागीच मृत्यू झाला. तर तिचे वडील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

साताऱ्यात ५० फूट खोल दरीत ट्रक कोसळला

सातारा तालुक्यातील कासरतळे येथे एक भीषण दुर्घटना घडली. पुनर्वसन झाल्यामुळे आपल्या घरातील सर्व साहित्य ट्रक मध्ये भरून हे कुटुंब निघाले होते. रस्त्याच्या कडेला उभा असलेला आयशर ट्रक अचानक ५० फूट खोल दरीत कोसळला. या अपघातात एका लहान मुलासह तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला. ट्रकमध्ये असलेले काही पशुधनही या अपघातात दगावले आहे. यातून ट्रक चालक सुदैवाने बचावला असून इतर जखमींवर सातारा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बुलढाण्यात मुला-मुलीच्या लग्नमंडपात शोककळा

बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर अत्यंत दुर्दैवी अपघात झाला. पंढरी त्र्यंबक बगाडे हे पायी जात असताना एका दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे, पंढरी बगाडे यांच्या मुलाचे आज लग्न होते, तर मुलीचे लग्न उद्यावर आले होते. घरात सनई-चौघडे वाजत असतानाच वडिलांच्या निधनाची बातमी आल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

लग्नाच्या अक्षता टाकून परतताना दाम्पत्य काळाच्या पडद्याआड

बीडच्या गेवराई तालुक्यातील कोळगावजवळ कल्याण-विशाखापट्टणम महामार्गावर भीषण अपघात झाला. शिरूर कासार तालुक्यातील निमगाव मायंबा येथील बाबूराव राम बळे आणि त्यांच्या पत्नी मंगल बाबूराव बळे हे लग्नाचे कार्य आटोपून आपल्या दुचाकीवरून घरी परतत होते. यावेळी एका भरधाव टेम्पोने त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. या धडकेत पती-पत्नी दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

अकोल्यात जेवण करून परतताना अज्ञात वाहनाची धडक

अकोला-पातूर रोडवर मध्यरात्रीच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. दिल्ली दरबार हॉटेलमध्ये जेवण करून दोन तरुण अकोल्याच्या दिशेने परतत होते. या भीषण धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा तरुण गंभीर जखमी आहे. अकोला जुने शहर पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या याप्रकरणाचा तपास सुरू आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now