सोलापूर, 5 एप्रिल (हिं.स.)।
जिल्ह्यातील ६२ हजार बेघर लाभार्थींना १५ हजार रुपयांचा पहिला हप्ता महिन्यापूर्वी मिळाला. पण बांधकाम साहित्य महागले, मोफत वाळू मिळत नसल्याने सुमारे १० हजार लाभार्थींना बांधकामेच सुरू केलेली नाहीत. दुसरीकडे जिल्ह्यातील नऊ हजार ७०० लाभार्थींना स्वप्नातील घर बांधकामासाठी स्वत:ची जागा नाही. त्यांना जागा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
प्रधानमंत्री आवास योजनेत घरकुल मंजूर झालेल्यांना लगेचच १५ हजार रुपयांचा पहिला हप्ता दिला जातो. बांधकाम सुरू होऊन पाया पूर्ण झाल्यावर दुसरा हप्ता तर लिंटल लेव्हलपर्यंत बांधकाम झाल्यावर तिसरा आणि काम पूर्ण झाल्यावर शेवटचा चौथा हप्ता मिळतो. दरम्यान, जिल्हा दरसुचीनुसार (डीएसआर) २६९ चौरस फूट घरकुल बांधकामासाठी दोन लाख २५ हजार रुपयांपर्यंत आहे.