सोलापूर, 5 एप्रिल (हिं.स.) राज्यात कांद्यासाठी लौकिक मिळविलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी सभापती तथा भाजपचे ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख यांनी न उतरण्याची भूमिका घेतली असताना दुसरीकडे त्यांचे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी म्हटले जाणारे आमदार सुभाष देशमुख हे मात्र आपले पॅनेल उभे करण्यावर ठाम आहेत. आपल्या सोबत कोणी आल्यास त्यांच्यासोबत आणि कोणी न आल्यास त्यांना सोडून निवडणूक लढविण्याचा पवित्रा जाहीर केला आहे.
या निवडणुकीत १८ जागांसाठी एकूण ४३९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान, या अर्जांपैकी समितीचे माजी सभापती, माजी आमदार दिलीप माने आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील काँग्रेसचे नेते सुरेश हसापुरे यांच्या उमेदवारीला हरकत घेण्यात आली असून, त्यावर निवडणूक अधिकारी किरण गायकवाड यांच्यासमोर सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.