Shetkari Sanghatana Protest : इंदापूर कोर्टातील कामकाज संपल्यानंतर एक धक्कादायक पण सुखद चित्र पाहायला मिळालं. त्यानंतर आगामी काळात राज्यातील शेतकरी आंदोलनाला नवी धार मिळणार का, याकडे लक्ष लागलं आहे.
पुणे : एकेकाळी ऊस आंदोलनाच्या मैदानात खांद्याला खांदा लावून लढणारे, मात्र नंतरच्या काळात राजकीयदृष्ट्या एकमेकांपासून दुभंगलेले दोन मोठे नेते अनेक वर्षांनंतर जाहीरपणे एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी इंदापूर न्यायालयाच्या आवारात एकत्र येत चहाचा आनंद घेतला.
या दोन्ही दिग्गज नेत्यांमध्ये गेल्या काही वर्षांत मोठे राजकीय मतभेद निर्माण झाले होते. मात्र, आज अचानक हे दोघे एकाच टेबलवर बसून चहा पिताना आणि गप्पा मारताना दिसल्याने उपस्थित शेतकरी कार्यकर्त्यांसह महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Indapur Session Court : ऊस आंदोलनाच्या खटल्याची सुनावणी
राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत हे इंदापूर येथे राजकीय कारणास्तव नाही, तर एका जुन्या आंदोलनाच्या केसच्या तारखेसाठी एकत्र आले होते. 2011 साली महाराष्ट्रात उसाला योग्य दर मिळावा यासाठी राज्यभर अतिशय तीव्र ऊस आंदोलन झाले होते. या आंदोलनादरम्यान राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यासह अनेक आंदोलक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते. याच खटल्याच्या सुनावणीसाठी शुक्रवारी इंदापूर सत्र न्यायालयात तारीख होती.
Court News Maharashtra : न्यायालयीन कामकाज संपल्यानंतर रंगल्या गप्पा
इंदापूर सत्र न्यायालयातील कामकाज संपल्यानंतर एक धक्कादायक पण सुखद चित्र पाहायला मिळालं. राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी कोर्टाबाहेर येत एकाच हॉटेलच्या टेबलवर, एकत्र बसण्याचा निर्णय घेतला. दोन्ही नेत्यांनी एकत्र चहाचा आस्वाद घेत जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि काही वेळ मनमोकळ्या गप्पा मारल्या. अनेक वर्षांनंतर हे दोन जुने सहकारी जाहीरपणे एकत्र आल्याने कोर्टाच्या आवारात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती.

Maharashtra Political Equations : भविष्यातील राजकीय समीकरणांची नांदी?
राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्या या चहाच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. आजची ही भेट केवळ न्यायालयीन कामकाजापुरती आणि तारखेपुरती मर्यादित होती की भविष्यातील नव्या राजकीय समीकरणांची नांदी आहे, याबाबत आता तर्कवितर्क लावले जात आहेत. शेतकरी चळवळीतून पुढे आलेले हे दोन मोठे चेहरे पुन्हा एकत्र आल्यास राज्याच्या राजकारणावर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो.
Sugarcane Price Movement : शेतकरी आंदोलनाला नवी धार मिळणार?
सध्या राज्यात ऊस दराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येत असून आगामी साखर हंगामही तोंडावर आला आहे. अशा अत्यंत महत्त्वाच्या काळात महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीतील हे दोन आक्रमक नेते एकत्र चहा घेताना दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये नवी आशा निर्माण झाली आहे. या भेटीमुळे आगामी काळात राज्यातील शेतकरी आंदोलनाला नवी धार मिळणार का, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.
ही बातमी वाचा:
तारीख आली रे! या दिवशी महाराष्ट्रात मान्सून धडकणार; मुंबईत होणार तुफान पाऊस!
















