Pandharpur News: उजनी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे सध्या चंद्रभागा दुथडी भरून वाहत असून भाविकांना पाण्याचा अंदाज न येण्याने अशा पद्धतीच्या घटना घडू लागल्या आहेत.
पंढरपूर: पंढरपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चंद्रभागेच्या नदी पात्रात बुडून आज (शनिवारी) सकाळी तीन महिला भाविकांचा मृत्यू झाला आहे. चंद्रभागेच्या पात्रात स्नानासाठी आलेल्या तीन भाविकांचा बुडून मृत्यू झाला असून यातील दोन महिलांचे मृतदेह सापडले आहेत. तर तिसऱ्या महिलेच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. उजनी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे सध्या चंद्रभागा दुथडी भरून वाहत असून भाविकांना पाण्याचा अंदाज न येण्याने अशा पद्धतीच्या घटना घडू लागल्या आहेत. मात्र प्रशासनाने या ठिकाणी खबरदारीचे उपाययोजना न केल्यामुळे भाविकांचे मृत्यू झाल्याचे समोर येत आहे.
पुंडलिक मंदिराजवळ स्नान करण्यासाठी नदीत उतरल्या
विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या तीन महिला भाविक आज सकाळी चंद्रभागा नदीत स्नानासाठी उतरल्या होत्या. जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे राहणार्या दोन महिला आणि एक अनोळखी महिला आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पाण्याचा अंदाज न आल्याने चंद्रभागेत बुडाल्या. आज सकाळी पुंडलिक मंदिराजवळ स्नान करण्यासाठी नदीत या महिला भाविक उतरल्या होत्या. मात्र, त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही, त्यामुळे ही दुर्घटना घडली आहे.
एका महिलेचा शोध सुरूच
नदीपात्रात स्नानास उतरलेल्या आपल्या सोबतच्या महिला भावीक बुडू लागल्यावर इतर महिलांनी आरडा ओरड करून मदतीसाठी पुकारणा केली. मात्र पाण्याचा प्रवाह वेगात असल्याने तिन्ही ही महिला बुडल्या. सुनीता सपकाळ (वय 43) आणि संगीता सपकाळ (वय 40) या दोन महिला या भोकरदन तालुक्यातील आहेत आणि एक महिला अनोळखी असल्याचे समजते. नंतर चंद्रभागेवरील कोळी बांधवांनी या बुडालेल्या दोन महिलांचा मृतदेह बाहेर काढला असून तिसऱ्या महिलेच्या मृतदेहाचा शोध अजूनही सुरू आहे. वास्तविक चंद्रभागेची पाणी पातळी वाढली असताना प्रशासनाने खबरदारीचे उपाय योजना करणे आवश्यक होते.
मात्र, अशा पद्धतीने प्रशासन गहाळ राहिल्याने या महिलांचा मृत्यू झाला आहे. किमान आता तरी प्रशासनाने जागी होऊन चंद्रभागेच्या पात्रात भाविकांचे प्राण वाचवण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी येणाऱ्या भाविकांकडून होऊ लागली आहे. आषाढी यात्रा काळात स्थानिक कोळी बांधवांना आपत्कालीन यंत्रणेत घेऊन अनेक बुडणाऱ्या भाविकांचे प्राण वाचवण्यात आले होते. मात्र यात्रा संपल्यावर प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले असून या आदिवासी कोळी बांधवांना भाविकांचे प्राण वाचवण्यासाठी गरजेनुसार आपत्कालीन यंत्रणेत तैनात ठेवल्यास पुढे तरी भाविकांना प्राण गमवावे लागणार नाहीत अशी भावना काहींनी व्यक्त केली आहे.
ना भूतो ना भविष्य ऑफर
प्रथमच टायटन EDGE सिरॅमिक घड्याळांवर Flat 20% सूट
ऑफर फक्त 18 जुलै ते 20 जुलै पर्यंतच