NCC in Primary School level: राज्यातील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना आता राष्ट्रीय छात्र सेनेचे (एनसीसी) प्रशिक्षण मिळणार आहे. यातून लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, देशप्रेम आणि नेतृत्वगुण विकसित होतील. क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निर्देशानंतर राज्य सरकारने ही प्रक्रिया गतिमान केली आहे. लवकरच या संदर्भात केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला जाईल. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभावना आणि क्रीडाप्रेम वाढेल.
मुंबई: राज्यातील प्राथमिक शाळांमधील विद्याथ्यांनाही लवकरच राष्ट्रीय छात्र सेनेचे ( एनसीसी ) प्रशिक्षण दिले जाणार असून, या माध्यमातून लहान क्यातच विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, देशप्रेम आणि नेतृत्वगुण विकसित करण्याचा प्रयत्न होणार आहे. या संदर्भात क्रीडामंत्री अॅड, माणिकराव कोकाटे यांनी दिलेल्या निर्देशांनंतर राज्य सरकारने प्राथमिक स्तरावर एनसीसी प्रशिक्षण सुरू करण्याची प्रक्रिया गतिमान केली आहे. त्यासाठी आता केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्याची तयारी सुरू झाली आहे.
‘एनसीसी’ प्रशिक्षण सध्या इयत्ता आठवी आणि नववीतील विद्यार्थ्यांसाठी राबवले जाते. मात्र, आता प्राथमिक शाळांतील विद्याथ्यांनाही या उपक्रमात सहभागी करून घेण्याचा निर्णय झाला आहे. विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच स्वयंशिस्त, तंदुरुस्ती आणि प्रगल्भ विचार विकसित व्हावेत, यासाठी शालेय पातळीवर क्रीडा व कवायतीचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे’, असे कोकाटे यांनी बैठकीत स्पष्ट केले.
शालेय शिक्षकांना माजी सैनिक, एनसीसीचे विद्यार्थी आणि क्रीडा शिक्षकांच्या मदतीने प्रशिक्षण देण्यात यावे, असेही कोकाटे यांनी सांगितले. एनसीसी हे नेतृत्वगुण, चारित्र्यसंवर्धन आणि सेवाभाव जोपासण्याचे प्रभावी माध्यम आहे. या प्रशिक्षणामुळे राष्ट्रप्रेमी आणि शिस्तबद्ध पिढी घडण्यास मदत होईल, असे कोकाटे यांनी नमूद केले.
या बैठकीला उपस्थित असलेले शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी, प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना एनसीसी प्रशिक्षण सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारला तातडीने सादर करण्याच्या सूचना दिल्या. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभावना, शिस्त आणि क्रीडाप्रेम वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संबंधित बातम्या





भविष्यात ऑलिम्पिकसारख्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा, यासाठी विविध खेळांचे सक्तीचे प्रशिक्षण देण्याचे धोरण तयार करण्याची गरज असल्याचेही कोकाटे यांनी सांगितले. क्रीडा शिक्षकांची संख्या वाढविण्यासाठी आणि स्पर्धांतील विजेत्या खेळाडूंना शिक्षक नियुक्तीत विशेष सवलत देण्यासाठी आवश्यक पावले उचलली जातील, असेही त्यांनी सांगितले.
पावणेदोन लाख विद्यार्थी –
सध्या राज्यातील विद्यालये आणि महाविद्यालयांमधील ‘एनसीसी’ अंतर्गत एकूण एक लाख ८८ हजार ८८४ विद्याथी प्रशिक्षण घेत आहेत. यामध्ये कनिष्ठ विभागात ६१ हजार ३२८ आणि वरिष्ठ विभागात ३९ हजार ५०२ विद्यार्थी सहभागी आहेत. प्राथमिक स्तरावरही हे प्रशिक्षण सुरू झाल्यास विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रनिष्ठा आणि सामाजिक जाणीव जोपासणारी नवी पिढी घडेल, अशी अपेक्षा कोकाटे यांनी व्यक्त केली.