Maharashtra Rain Update: आज 27 जुलै 2026 रोजी राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढणार असून काही जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ तर घाटमाथा व किनारपट्टीच्या भागांना ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

Maharashtra Rain Update: राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हजेरी लावत आहे. हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील पावसाची ही स्थिती अशीच कायम राहण्याची शक्यता आहे. आज 27 जुलै 2026 रोजी राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढणार असून काही जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ तर घाटमाथा व किनारपट्टीच्या भागांना ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
विदर्भातील भंडारा, अमरावती, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या सहा जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे अकोला, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून कोणताही विशेष अलर्ट वर्तवण्यात आलेला नाही. तर मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज असून या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच धाराशिव, बीड आणि परभणी जिल्ह्यांत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
North and West Maharashtra Rain Update: उत्तर अन् पश्चिम महाराष्ट्रात कसं असेल हवामान?
उत्तर महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, त्यामुळे येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत तसेच नाशिक घाटमाथा परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथा परिसरात अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता असल्याने येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे शहरात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. सातारा व कोल्हापूरमध्ये हलका ते मध्यम पाऊस होईल, तर सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांत हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.

Mumbai, Thane Yellow Alert: मुंबई, ठाण्याला यलो अलर्ट
कोकणात पावसाचा जोर कायम राहणार आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पालघर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच मुंबई, ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, घाटमाथ्याच्या परिसरात प्रवास करणाऱ्या नागरिकांनी आणि शेतकरी बांधवांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Nashik Rain Update: सलग पाच दिवसांपासून गोदावरी नदीची पुरस्थिती कायम
नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी नदीची पुरस्थिती सलग पाचव्या दिवशीही कायम आहे. गोदाकाठावरील अनेक मंदिरे अद्याप पाण्याखाली असून दुतोंड्या मारुती मंदिरातील मूर्तीच्या छातीपर्यंत पाणी आहे. जिल्ह्यातील 14 धरणांतून आजही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गंगापूर धरणातून 4,997 क्युसेक, तर दारणा धरणातून 13,250 क्युसेक पाणी सोडले जात आहे. नांदूरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीकडे 43,068 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
गंगापूर धरणातील विसर्ग काहीसा कमी झाल्याने गोदावरी नदीची पाणीपातळी हळूहळू घटत असून नदी पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या चार ते पाच दिवसांच्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण 80 टक्के पाणीसाठा झाला असून दारणा, कडवा, भावली, पालखेड, पुणेगाव, ओझरखेड, गौतमी गोदावरी, कश्यपी आणि वालदेवीसह इतर धरणांतूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे.













