छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला आणि पक्ष बदलावा म्हणून माझा छळ झाला, असे विधान शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केलं. त्यांनी स्वत:ची तुलना संभाजी महाराजांशी करत हे विधान केल्याने मोठी खळबळ माजली आहे.
अभिनेता विकी कौशल याचा ‘छावा’ चित्रपट सध्या बराच चर्चेत आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर बरीच कमाई केली आहे. मात्र आता याच चित्रपटाचा संदर्भ देत राज्यातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केलेल्या एका विधानामुळे नवा वाद पेटण्याची चिन्हे आहेत. ‘छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला आणि पक्ष बदलावा म्हणून माझा छळ झाला’, असे विधान करत अनिल परब यांनी आरोप केल्याने मोठी खळबळ माजली आहे. हे विधान करत त्यांनी स्वत:ची छत्रपती संभाजी महाराजांसोबत तुलना केली. पण त्यांच्या या विधानामुळे आता राज्यभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून नव्या वादाची ठिणगी पेटण्याची शक्या आहे. अनिल परब यांनी स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांशी केल्याने आता त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. भाजपनेही त्यांच्या या विधानानंतर आक्रमक भूमिका घेतली असून ते याविरोधात आंदोलन करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून अनेक मुद्यांवरून वाद सुरू असल्याचे दिसत आहे. काल राज्यपांलाच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान अनिल परब बोलत होते. मात्र त्यावेळी अनिल परब यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख केला. तेव्हा त्यांनी हे वक्तव्य केलं.
काय म्हणाले अनिल परब ?
संभाजी महाराजांचा विचार, वारसा कोणी चालवला असेल तर ‘छावा’ बघा आणि मलापण बघा. धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला आणि माझा पक्षा बदलावा म्हणून छळ झाला असा आरोप अनिल परब यांनी केला. ईडीची नोटीस, ईडीची कारवाई, सीबीआय, इन्कम टॅक्स… चांगलचं आहे ना, मी पण तेवढाच कडक आहे ना..! ते राऊत साहेब गेले, थोडे कच्चे निघाले, मी तुम्हाला पुरून उरलो. माझ्यावरती अनन्य अत्याचार झाले आहेत, मी सगळं भोगलेलं आहे, पण मी देखील त्यांचा वारसा जपणारा आहे, त्यांच्या वारशावरती बोलण्याचा हक्क आहे मला.
मी पक्ष बदलला नाही, याचा मला अभिमान वाटतो. जे पक्ष बदलून गेले, ते आता आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांचा वारसा सांगत आहे, अशीही टीका अनिल परब यांनी केली.
सम्बंधित ख़बरें





मात्र, अनिल परब यांनी स्वतःची छत्रपती संभाजी महाराजांबद्दल तुलना केल्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे. भाजपकडून त्यांच्याविरोधात आंदोलन केले जाणार आहे.