नाझरा (वार्ताहर):-संपूर्ण वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत समजल्या जाणार्या विठ्ठलाचा आषाढी सोहळा प्रचंड उत्साहात संपन्न झाला. असंख्य भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी ऊन वारा पाऊस यासारख्या असंख्य समस्यांवर मात करून पंढरपूरच्या दिशेने आले होते. आषाढी वारी करून घरी परतणार्या एका वारकर्याच्या जीवनात एक वेगळाच प्रसंग घडला.
पंढरपूरहुन परतणार्या भाविकाला एसटीमध्ये अचानक हृदयविकाराचा झटका आला. प्रसंगावधान दाखवत चालकाने तात्काळ एसटी सांगोला आगारात परत आणली आणि तेथील कर्मचार्यांनी केलेल्या मदतीने एका भाविकांचे प्राण वाचले. दवाखान्यात आणलेल्या व्यक्ती शुद्धीवर आल्यानंतर म्हणाला की, पंढरपूरला विठ्ठलाला भेटायला गेलो होतो. पंढरपुरातच विठ्ठल भेटतो असे नाही तर परतीच्या मार्गावरच आपल्याला या एस टी कर्मचार्याच्या रूपाने विठ्ठल भेटला. अशी कृतार्थ भावना त्यांनी व्यक्त केली.
विठ्ठल दर्शनाच्या ओढीने पंढरपूरच्या दिशेने असंख्य भावीक येत असतात. काहींना विठ्ठलाचे दर्शन होते तर काहीं नामदेव पायरीचे दर्शन घेऊन परतीचा मार्ग पकडतात. कोल्हापूरचे भाविक बळवंत पाटील हे विठ्ठलाच्या भेटीच्या ओढीने पंढरपूरला आले होते. पंढरपुरात दर्शन घेतल्यानंतर सांगोला आगाराच्या सोलापूर कोल्हापूर या एसटीने परतीच्या प्रवासास निघाले. सांगोल्यातून बाहेर पडल्यावर त्याच्या छातीत अचानक दुखू लागले, तेव्हा बस सांगोला आगारात आणण्यात आली. त्या प्रवाशासोबत कोणतेही नातेवाईक नसल्याने खूप मोठी अडचण निर्माण झाली. कोणी प्रवासी त्यांच्यासोबत थांबायला तयार होईना,अशा वेळी सांगोला बस स्थानक आगारात सेवा बजावणारे दिनकर सुतार यांनी तात्काळ बळवंत पाटील यांना स्वतःच्या गाडीतून सांगोल्यातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. दुपारी तीन वाजता त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले, त्यांना नीट बोलताही येत नव्हते. तपासणी केल्यानंतर हृदयविकाराचा झटका येऊन गेल्याचे डॉक्टरांनी सांगितले, पुढील उपचार तात्काळ करण्यात आले. विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या त्यानंतर ते व्यवस्थित शुद्धीवर आल्यावर त्यांच्या कोल्हापूर येथील घरी संपर्क साधण्यात आला. त्यांचे पुत्र अभिजीत पाटील तात्काळ सांगोला कडे रवाना झाले.
सायंकाळी सात वाजता बळवंत पाटील व्यवस्थित शुद्धीवर आल्यावर त्यांनी सांगोला आगारातील कर्मचारी दिनकर सुतार व त्यांच्या सहकार्यांचे आभार मानले. आपल्या रूपाने साक्षात विठ्ठलच माझ्या मदतीला धावून आला अशी भावना व्यक्त करत आपल्या डोळ्यातील अश्रूंना मोकळी वाट करून दिली. त्यांचे सुपुत्र अभिजीत पाटील आल्यानंतर त्यांना झालेला सर्व प्रकार कळाला तेव्हा त्यांनी सुतार यांचे पाया पडून दर्शन घेतले. आमच्या परिवारासाठी आमचे वडील म्हणजे विठ्ठल आहेत. तुमच्यामुळे आमचे विठ्ठल सुखरूप असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.आगारात आलेल्या प्रवाशाची अशी काळजी घेतल्याबद्दल दिनकर सुतार यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सध्या प्रचंड धक्कादाकीच्या जीवनामध्ये कुणीच कुणासाठी वेळ द्यायला तयार नसतो. मी,माझं आणि आपल अशी भावना समाजात वाढीस लागत आहे. असे असताना सांगोला आगारातील कर्तव्यदक्ष कर्मचारी दिनकर सुतार यांनी प्रवाशाबद्दल घेतलेली ही काळजी निश्चितच समाज व्यवस्थेसाठी आदर्श आहे. आपल्या आगारातील प्रवाशाला स्वतःच्या गाडीतून घेऊन जाणे व त्यांच्यावर व्यवस्थितपणे उपचार करणे व त्यांचे नातेवाईक येईपर्यंत काळजी घेणे असे संवेदनशील मन प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात जपायला हवे….
सुनील बनसोडे -सदस्य बालभारती पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ पुणे