टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा चौथा बळी; 75 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू, अकोल्यात सर्वाधिक 47 अंश तापमान

मृत शेतकऱ्याचे नाव त्र्यंबक नारायण बेळंबे असे असून दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास ते स्वतःच्या शेतात जनावरांसाठी चारा कापत असताना अचानक त्यांना चक्कर आली

लातूर : यंदाच्या उन्हाळ्यातही (Summer) एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कडक उन्हाचा कहर जाणवत असून विदर्भ आणि मराठवाड्यात तापमान चांगलंच वाढलं आहे. उष्माघातामुळे काही ठिकाणी मृत्यू झाल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. लातूर (Latur) जिल्ह्यातही मे महिन्याच्या सुरुवातीआधीच उष्माघाताच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असून आज आणखी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथे 75 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून उष्माघाताने त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात उष्माघातामुळे मृतांचा आकडा आता चारवर पोहोचला आहे.

मृत शेतकऱ्याचे नाव त्र्यंबक नारायण बेळंबे असे असून दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास ते स्वतःच्या शेतात जनावरांसाठी चारा कापत असताना अचानक त्यांना चक्कर आली आणि ते खाली कोसळले. त्यांना तात्काळ पानचिंचोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यापूर्वी जिल्ह्यात उष्माघातामुळे मृत्यू झाल्याच्या तीन घटना समोर आल्या होत्या.

औसा तालुक्यातील एरंडी गावात 25 वर्षीय महेश लिंबाजी इंगोले या तरुणाचा शेतातील कामावरून घरी आल्यानंतर चक्कर येऊन मृत्यू झाला होता. तर, औसा तालुक्यातील गोंद्री येथे नऊ महिन्यांच्या बाळाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. आणखी एका घटनेत औराद शहाजनी येथे 60 वर्षीय शेतकऱ्याचाही प्रखर उन्हामुळे मृत्यू झाला होता. गेल्या काही दिवसांपासून लातूर जिल्ह्यात तापमानात सातत्याने वाढ होत असून दुपारच्या सुमारास तापमान 40 ते 41 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत आहे. औराद शहाजानी भागात हवामान केंद्रावर 43 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाची नोंद झाली आहे. तीव्र उष्णतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकरी वर्ग यांना विशेष धोका निर्माण झाला आहे.

अकोल्यात 47 अंश तापमानाची नोंद

दरम्यान, प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून नागरिकांना अत्यावश्यक कामांशिवाय दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडू नये, पुरेसे पाणी प्यावे, हलके व सैल कपडे परिधान करावेत आणि लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. विदर्भात राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असून अकोल्यात तापमान 47 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचल्याची नोंद आहे. अमरावतीमध्ये 45.2 तर वर्ध्यात 45.0 अंश तापमानाची नोंद झाली आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा