टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

सांगोल्यात माजी खासदार निंबाळकर यांची आढावा बैठक; पाणी प्रश्नांवर तातडीने झाले निर्णय, शेतकऱ्यांमध्ये समाधान 

सांगोला : सांगोला तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नांवर माजी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी आढावा बैठक घेत नागरिक, व्यापारी व शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. बैठकीदरम्यान त्यांनी अनेक प्रश्नांवर संबंधित अधिकाऱ्यांशी थेट फोनवरून संपर्क साधत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

शहरातील हॉटेल माऊली येथे झालेल्या बैठकीत पाणीटंचाई, वीज समस्या तसेच टेंभू–म्हैसाळ व नीरा उजवा कालव्याच्या पाण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. घेरडी परिसरातील कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्याबाबतही अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. शहरातील सूतगिरणी परिसरात कोल्हापूर–सोलापूर मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या शहरातील रस्त्यावर मोठी वाहने आणताना वाहतूक अडचणींची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून लवकरच दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले. या बैठकीमध्ये शहरातील व्यापाऱ्यांनी, नागरिकांनी, विशेषत: शेतकऱ्यांनी आपल्या समस्या माजी खासदारांसमोर मांडल्या. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, बाळासाहेब एरंडे, माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, माजी नगराध्यक्ष मारुती बनकर,बाळासाहेब काटकर, राजू मगर, डॉ. विजय बाबर, प्रशांत वलेकर, सिद्धेश्वर गाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

याच भेटीदरम्यान नगरसेवक जुबेर मुजावर यांच्या कार्यालयात मुस्लिम समाजाच्या दफनभूमीच्या प्रश्नावर चर्चा झाली. या संदर्भात निंबाळकर यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत तो प्रश्न मार्गी लावण्याबाबत चर्चा केली. या बैठकीत उपस्थित नागरिकांनी पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर अधिक लक्ष देण्याची मागणी केली. निंबाळकर यांनी सर्व प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगत सकारात्मक प्रतिसाद दिल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांच्या कार्यालयास भेट –

सांगोला दौऱ्यादरम्यान रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याची माहिती मात्र समोर आली नाही.

‘दादा, उन्हाळा संपेपर्यंत आमच्याकडे लक्ष द्या’

बैठकीत विविध गावांतील नागरिक, व्यापारी व शेतकऱ्यांनी पाणीटंचाईचे प्रश्न मांडले. “तुमच्या काळात टेंभू–म्हैसाळसह विविध योजनांमुळे पाणी मिळाले. सध्याच्या तीव्र उन्हाळ्यातही तुम्ही आमच्याकडे लक्ष द्या,” अशी विनंती अनेकांनी निंबाळकर यांच्याकडे केली. यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले.

 ४ मे ला सोडणार माण नदीत पाणी

या बैठकीमध्ये अनेक शेतकऱ्यांनी पाणी प्रश्नाबाबत चर्चा केली. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर माण नदीला लवकर पाणी सोडण्याबाबत शेतकऱ्यांनी सांगितले. माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी लगेचच वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करीत  अधिकाऱ्यांना तालुक्यातील उन्हाळ्याची स्थिती सांगत लगेच पाणी सोडण्याबात सांगितले. यावेळी अधिकाऱ्यांनी चार मे पासून माण नदीत पाणी सोडण्याचे आश्वासन दिले. या निर्णयामुळे शेतकऱ्यांमधून समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now