नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात आज सकाळी भीषण अपघात झाला. वणी रोडवर अल्टो कार आणि मोटारसायकलची धडक झाली, ज्यात सात जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन महिला, तीन पुरूष आणि एक बालक आहेत. अपघातात दोघे जखमी झाले आहेत.
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात आज सकाळी एक भीषण अपघात घडला आहे. नाशिकमध्ये दिंडोरी तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील वणी रोडवर मोटारसायकल आणि अल्टो कार यांच्यात जबरदस्त धडक झाली. या धडकेत सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या मृतांमध्ये तीन महिला, तीन पुरुष आणि एका लहान बालकाचा समावेश आहे, ज्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व मृत व्यक्ती कोशिंबे, देवठाण आणि सारसाळे येथील रहिवासी होते. अल्टो कारमधील गांगुर्डे कुटुंबिय त्यांच्या नातेवाईकाच्या मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी नाशिक येथे गेले होते. यानंतर परत दिंडोरीतील सारसाळे या ठिकाणी परतत असताना हा अपघात घडला. यावेळी अल्टो कार आणि मोटारसायकल यांच्यात जबरदस्त धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की कारच्या पुढच्या बाजूला असलेल्या काचेचा चक्काचूर झाला.
यानंतर अल्टो कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या पाण्याच्या नाल्यात उलटली. गाडीतील व्यक्तींना बाहेर पडता न आल्याने आणि त्यांच्या नाका-तोंडात पाणी गेल्याने बुडून त्यांचा मृत्यू झाला, असे प्राथमिक तपासात दिसून येत आहे. या प्रकरणी दिंडोरी पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेची माहिती मिळताच माजी नगराध्यक्ष कैलास मवाळ यांनी घटनास्थळी धाव घेऊन पीडित कुटुंबांचे सांत्वन केले.
अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे
- देविदास पंडित गांगुर्डे (वय २८, रा. सारसाळे, ता. दिंडोरी, जि. नाशिक)
- मनीषा देविदास गांगुर्डे (वय २३, रा. सारसाळे, ता. दिंडोरी, जि. नाशिक)
- उत्तम एकनाथ जाधव (वय ४२, रा. कोशिंबे, ता. दिंडोरी, जि. नाशिक)
- अल्का उत्तम जाधव (वय ३८, रा. कोशिंबे, ता. दिंडोरी, जि. नाशिक)
- दत्तात्रेय नामदेव वाघमारे (वय ४५, रा. देवपूर, देवठाण, ता. दिंडोरी, जि. नाशिक)
- अनुसया दत्तात्रय वाघमारे (वय ४०, रा. देवपूर, देवठाण, ता. दिंडोरी, जि. नाशिक)
- भावेश देविदास गांगुर्डे (वय २, रा. सारसाळे, ता. दिंडोरी, जि. नाशिक)
या अपघातात मंगेश यशवंत कुरघडे (वय २५) आणि अजय जगन्नाथ गोंद (वय १८) हे दोघे जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.