Congress Baramati Election: राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Baramati By Election 2026) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे.

पुणे: राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Baramati By Election 2026) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) रिंगणात आहेत. त्यामुळे बारामतीची पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी, अशी हालचाल सुरु आहे. गेल्या अनेक दिवसांपासून निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादीसह महायुतीचे प्रयत्न सुरू होते. काँग्रेसने माघार घ्यावी यासाठी गाठीभेटी, फोनाफोनी सुरू होती, आता अखेर आज दुपारी काँग्रेस आपला अर्ज परत घेणार असल्याची माहिती आहे.
“या निर्णायापूर्वी दिल्लीच्या हायकमांडशी चर्चा करुन त्यांच्या कानावर ही गोष्ट टाकावी लागेल आणि त्यांचा आदेश आल्यानंतर तो फॉर्म विड्रॉ करण्याची प्रक्रिया सुरु होईल. आमची भावना म्हणण्यापेक्षा विशेष करुन मला तर नाही पण प्रदेश अध्यक्षांना अनेकांचे फोन आलेत. सत्ताधारी पक्षातील म्हणा किंवा उपमुख्यमंत्री जे आता निवडणुक लढत आहेत सुनेत्रा पवार आणि त्यांचाही फोन होता. एकूण तिथली परिस्थती पाहता एकूण, सगळ्या लोकांची भावना लक्षात घेता, तिकडे निवडणुकीमधून पुढे जाणं हे थांबावं अशा प्रकारची भूमिका दिसली. आमच्या सर्वांचे एकमत झालेलं आहे”, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
काँग्रेस उमेदवार बारामती विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून आज दुपारपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेईल, अशी विजय वडेट्टीवार यांनी माहिती दिली आहे. प्रदेशाध्यक्ष सोबत काल सर्वप्रमुख नेत्यांची चर्चा झाली, अनेकांनी आपली भावना प्रदेशाध्यक्षांपर्यंत व्यक्त केली. माघार घेतली पाहिजे अशी अनेकांची भूमिका होती. आता प्रदेशाध्यक्ष सर्व नेत्यांची भावना केंद्रीय श्रेष्ठींना कळवतील, त्यांच्या परवानगी दुपारपर्यंत अर्ज मागे घेण्याचा निर्णय होईल अशी शक्यता आहे.
मल्लिकार्जुन खर्गे यांचा दिल्लीतुन हर्षवर्धन सपकाळांशी संवाद
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत संवाद साधत आहेत. रमेश चेन्निथला हर्षवर्धन सपकाळ आणि दिल्लीतील नेत्यांची चर्चा सुरू आहे. बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसने माघार घेण्याच्या संदर्भात अद्याप निर्णय घेतलेला नाही. माघारीची घोषणा विजय वडेट्टीवारांनी केली असली तरी, कॉग्रेसचा अधिकृत निर्णय झालेला नाही. बारामती पोटनिवडणूकीची उमेदवारी मागे घेण्याबाबत कॉग्रेसमध्येच असमन्वय आहे. कॉंग्रेस हायकमांडचा निर्णय येण्याआधीच विजय वडेट्टीवारांनी परस्पर बारामती पोट निवडणूकीतून माघारीची घोषणा केली. सध्या मल्लिकार्जुन खर्गे आणि कॉग्रेसचे वरिष्ठ नेते यांची चर्चा सुरु आहे.
माघारीची घोषणा विजय वडेट्टीवारांनी केली असली तरी, कॉंग्रेसचा अधिकृत निर्णय झालेला नाही
माघारीची घोषणा विजय वडेट्टीवारांनी केली असली तरी, कॉंग्रेसचा अधिकृत निर्णय झालेला नाही अशी माहिती समोर आली आहे. बारामती पोटनिवडणूकीची उमेदवारी मागे घेण्याबाबत कॉंग्रेसमध्येच असमन्वय असल्याचं दिसून येत आहे. कॉंग्रेस हायकमांडचा निर्णय येण्याआधीच विजय वडेट्टीवारांनी परस्पर बारामती पोट निवडणूकीतून माघारीची घोषणा केली. सध्या मल्लिकार्जुन खर्गे आणि कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते यांची चर्चा सुरु आहे.






