सांगोला(प्रतिनिधी):-सांगोला तालुक्यातील 76 ग्रामपंचायतीचे सन 2025 ते 2030 या पंचवार्षिक कालावधीसाठीचे सरपंच पदाचे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम तहसिलदार सांगोला यांचे अध्यक्षतेखाली दि. 15 जुलै 2025 रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृतीभवन सांगोला येथे दुपारी. 12.00 वाजता आयोजित केला असल्याची माहिती तहसीलदार संतोष कणसे यांनी दिली.
सांगोला तालुक्यातील 76 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण दोन महिन्यांपूर्वी जाहीर करण्यात आले होते. मात्र, ते आरक्षण रद्द करुन नव्याने आरक्षण प्रक्रिया राबविण्यात येणार असून त्यानुसार नव्याने बुधवारी (दि.15) तालुक्यातील ग्रामपंचायतींमधील सरपंच पदाची आरक्षण सोडत होणार आहे. त्यामुळे अनेक गावांतील राजकीय समीकरणे बदलणार असल्याने अनेक इच्छुकांच्या आशेवर पाणी फिरणार आहे. एकूणच, नव्याने आरक्षण जाहीर होणार असल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या भावी सरपंचांची स्वप्न धुळीस मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
तालुक्यातील 76 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण 2025 ते 2030 या कालावधीकरिता एप्रिल 2025 मध्ये जाहीर करण्यात आले होते. कोणती जागा कुणाला सुटली हे स्पष्ट झाल्याने गावगाड्यातील भावी सरपंच कामाला लागले होते. एवढेच नव्हे, तर अनेकांनी जनसंपर्क वाढविला होता. असे असतानाच शासनाकडून नव्याने आरक्षण निर्णय झाला आहे. नवीन आरक्षणामुळे वेगवेगळ्या प्रवर्गातील उमेदवारांनी संधी मिळेल आणि त्यामुळे स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे बदलू शकतात. त्यामुळे या आरक्षणाकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.
संबंधित बातम्या




