परगणा जिल्ह्यातील मध्यग्राम येथे बुधवारी रात्री भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक (PA) चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग केला.

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये झालेल्या निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. यानंतर आता तेथील राजकारण तापले आहे. त्यातच परगणा जिल्ह्यातील मध्यग्राम येथे बुधवारी रात्री भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक (PA) चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग केला आणि त्यानंतर दोहरिया परिसरात गोळीबार केला. स्थानिक सूत्रांनुसार, चार गोळ्या झाडण्यात आल्या, त्यापैकी तीन गोळ्या चंद्रनाथ यांच्या डोक्यात लागल्या.
चंद्रनाथ रथ हे एका कामानिमित्त कारने जात असताना हल्लेखोरांनी त्यांची गाडी थांबवली. गाडी थांबताच दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी चंद्रनाथ यांच्यावर गोळीबार केला. यात गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या चंद्रनाथ यांना रुग्णालयात नेण्यात आले, जिथे नंतर त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात घबराट पसरली आहे. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, तपास सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, चंद्रनाथ रथ यांच्या हत्येवरून भाजपने तृणमूल काँग्रेसवर आरोप केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात आणखी एक व्यक्ती जखमी झाली असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हल्लेखोरांनी चंद्रनाथ यांचा बराच वेळ पाठलाग केला. त्यांची गाडी हळू होताच त्यांनी गोळीबार सुरू केला.
गोळीबाराचा व्हिडिओ होतोय व्हायरल
या गोळीबाराचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. यात गोळ्या लागून गाडीच्या पुढील आणि बाजूच्या काचा फुटल्या आहेत. दरम्यान, या हत्येनंतर पोलीस आणि केंद्रीय दलांनी परिसराला घेराव घातला आहे. हत्येची बातमी पसरल्यानंतर भाजप कार्यकर्ते आणि समर्थक वैद्यकीय केंद्राबाहेर जमले आणि त्यांनी आपला संताप व्यक्त करत आहेत.
निवडणुकीत केली होती मोठी मदत
भाजपच्या सूत्रांनुसार, भवानीपूर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीदरम्यान सुवेंदू अधिकारी यांच्यासाठी काम करणाऱ्या टीममधील चंद्रनाथ हे प्रमुख सदस्यांपैकी एक होते. त्यांच्यासोबत उपस्थित असलेले बुद्धदेव बेरा हे त्या पथकाचा भाग असल्याचे सांगितले जात असून, ते या हल्ल्यात जखमी झाले आहेत.
हिंसाचाराची 200 प्रकरणांची नोंद
निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये उसळलेल्या हिंसाचारात मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांचे वैयक्तिक सहाय्यक (पीए) चंद्रनाथ रथ यांच्यासह आणखी तिघांचा मृत्यू झाला. पोलिसांनी हिंसाचार, जाळपोळ, तोडफोड आणि हल्ल्याशी संबंधित जवळपास २०० गुन्हे दाखल केले असून ४३३ जणांना अटक केली आहे. ११०० हून अधिक लोकांना प्रतिबंधात्मक कोठडीत घेण्यात आले आहे.
















